मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व मंत्री आणि आमदारांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. येत्या गुरुवारी 6 एप्रिलला संध्याकाळी 6 वाजता ही बैठक घेतली जाणार आहे. राज्य सरकारमधील महत्त्वाच्या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. तसंच राज्य मंत्रिमंडळातील शिवसेनेच्या मंत्र्यांचा खांदेपालट होण्याचीही दाट शक्यता आहे.
उद्धव ठाकरेंकडून पक्षांतर्गत मोठ्या फेरबदलांचे संकेत : सूत्र
गेल्या काही दिवसांमध्ये शिवसेनेच्या आमदारांमध्ये सुप्त संघर्ष पाहायला मिळाला आहे. त्यामुळे याआधी आमदार आणि मंत्र्यांच्या उद्धव ठाकरेंसोबत व्यक्तीगत पातळीवर बैठका झाल्या आहेत. आता सर्वांच्या एकत्रित बैठकीत यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. आमदारांचा समान निधी वाटपाच्या मुद्द्यावरही या बैठकीत चर्चा होऊ शकते.
राज्य मंत्रीमंडळातील मंत्र्यांची असमाधानकारक स्थितीमुळे त्याचा फटका स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकांमध्ये शिवसेनेला बसला आहे. मंत्र्यावर नाराज स्थानिक नेत्यांनी आणि आमदारांनी वारंवार शिवसेना पक्षप्रमुखांसमोर आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळी पक्षात चांगले बदल घडतील असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं. आता 6 तारखेच्या बैठकीत नेमकं काय होतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.