नवी मुंबई : नवी मुंबईत शेतकरी महेंद्र देशमुख यांना कृषीमंत्र्यांनी भेटायला मंत्रालयात बोलवले आहे. बॅंक अधिकारी आणि पनवेलचे तहसीलदार अमित सानप बैठकीला हजर आहेत. सकाळपासून देशमुख यांचं तहसील कार्यालयासमोर आंदोलन सुरु होतं. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबंधित शेतकऱ्याचे काय काम आहे, याबाबत विचारपूस करुन त्यांना मुक्त करण्याचे आदेश दिले होते. त्यावरुन आज कृषीमंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यासह बॅंक अधिकारी आणि पनवेलचे तहसीलदारांना मंत्रालयात बोलावून घेतले. नसलेलं कर्ज बँक ऑफ इंडियाने दाखवल्याचा त्यांचा आरोप आहे. काल मातोश्रीबाहेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या महेंद्र देशमुख यांनी आज देखील पनवेल तहसील कार्यालयात सहकुटुंब आंदोलन केलं. देशमुख यांनी तहसीलदारांच्या कार्यालयात जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी त्यांना कार्यालयाबाहेर अडवलं. बँक ऑफ इंडियाच्या आपटा शाखेने फसवणूक केल्याचा देशमुख यांचा आरोप आहे. बॅंक आॅफ इंडिया च्या अधिकाऱ्यांना त्वरीत पनवेल तहशील कार्यालयात बोलविण्याची देशमुख यांनी मागणी केली आहे. देशमुख यांना पनवेल शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आलं होतं.


काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी आलेल्या या शेतकऱ्याला लहान मुलीसह पोलीसांनी जबरदस्तीने मातोश्रीबाहेरुन ताब्यात घेतलं होतं. त्यांना भेटण्यास नकार देत पोलीसांनी धक्काबुक्की करत ताब्यात घेतले. या शेतकऱ्याला पोलीसांनी ठाण्यात बसवून ठेवलं होतं. कोणत्याही माध्यम प्रतिनिधीस संवाद साधण्यास मज्जाव केला होता. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या शेतकऱ्याची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. संबंधित शेतकऱ्याचे काय काम आहे, याबाबत विचारपूस करुन त्यांना मुक्त करण्याचे आदेश दिले होते.



देशमुख यांच्यावर कर्जाचा डोंगर असून बँक त्यांची अडवणूक करत असल्याचे त्यांनी सांगितले. मी सर्व कागदपत्रांची पूर्तता केली आहे, तरीसुद्धी बँक अडवणूक करत असल्याचा त्यांनी आरोप केला आहे. याच संदर्भात एक फाईल घेऊन देशमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी काल मातोश्री बाहेर आले होते. त्यांच्यासोबत आठ वर्षांची मुलगीही होती. मात्र, दोन तीन तासांनंतरही त्यांना मुख्यमंत्र्यांना भेटता आले नाही. त्यामुळे त्यांनी मातोश्रीच्या आत जाऊ देण्याची विनंती पोलीसांना केली. ही विनंती नाकारत पोलीसांनी त्यांना ताब्यात घेण्याच प्रयत्न केला. यावेळी देशमुख आणि त्यांच्या मुलीला थोडी धक्काबुक्कीही झाली होती.

हेही वाचा - मातोश्रीबाहेरुन पोलीसांनी ताब्यात घेतलेल्या शेतकऱ्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल

मातोश्रीबाहेरुन पोलीसांनी ताब्यात घेतलेल्या शेतकऱ्यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीका केली होती. शेतकऱ्यांवर सातत्याने अन्याय होतोच आहे. पण अवघ्या 8 वर्षांच्या लहान मुलीला 'मातोश्री'बाहेर अशी वागणूक मिळत असेल, तर राज्यातील जनतेने अपेक्षा करायची तरी कुणाकडून? मुख्यमंत्र्यांनी या प्रकाराची दखल घ्यावी, असं ट्वीट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं.