मुंबई : कुणी घर देता का घर... अशी अवस्था हजारो गीते गाणाऱ्या, बनवणाऱ्या कलाकार कोकाटे दाम्पत्यावर आली आहे. हजारो भीम गीते, लोकगीते, प्रबोधन गीते गाणाऱ्या आणि लिहिणाऱ्या गायिका मैना कोकाटे आणि कवी लेखक माणिक कोकाटे यांचे 10 बाय 10 पेक्षाही लहान असलेले घर सध्या कोसळले आहे आणि त्यांच्यावर बेघर होण्याची वेळ आली आहे.
मैना कोकाटे या 1980 सालापासून त्यांनी प्रल्हाद शिंदे, विठ्ठल उमप, संभाजी भगत, वामन कर्डक, महेंद्र कपूर, आनंद शिंदे, मिलिंद शिंदे अशा अनेक दिगगजांबरोबर हजारो गाणी गायली. यात अनेक भीम गीते, आंबेडकरी चळवळीची गीते, प्रबोधनपर गीते, भावगीते यांचा समावेश होता. त्यांचे पती माणिक कोकाटे देखील उत्तम कवी आणि लेखक आहेत.
मात्र कलेची श्रीमंती असलेल्या या कोकाटे दाम्पत्यांच्या पदरी मात्र आर्थिक गरिबीच पडली. इतक्या वर्ष कलेची सेवा करूनही एक छोटं छतही त्यांना लाभले नाही. जे घर आहे ते देखील कोसळलं आहे. त्याच्या दुरुस्तीसाठी देखील आता त्यांच्याकडे पैसे नाहीत. त्यांच्या विभागातील एका व्यक्तीने त्यांच्या घरात तात्पुरता त्यांना आसरा दिला आहे. तरी आता तिथेही रहाणे अशक्य होत आहे.
कलेसाठी आपले आयुष्य अर्पण करणाऱ्या आणि त्यांच्या काळात प्रसिद्धीची झोतात असलेल्या मैना कोकाटे सध्या घरासाठी मदतीचा हात मागत आहेत. शासन दरबारी त्यांची दखल घेतली गेली नाही आणि त्यांना मदतही झाली नाही. मात्र आता जनतेनेच त्यांना मदतीचा हात द्यावा अशी त्यांची विनंती आहे.