EPFO : भविष्य निर्वाह निधी (PF) खातेधारक जमा केलेल्या रकमेवर मिळणाऱ्या व्याजाची प्रतिक्षा करीत आहेत. चालू आर्थिक वर्ष संपण्यास काही दिवस राहिले आहेत. पण, अद्यापही पीएफचे व्याज (PF Interest) अद्याप लोकांच्या खात्यात जमा झालेले नाही. खातेधारक ट्विटरवर ईपीएफओकडे तक्रार करत आहेत. अशाच एका तक्रारीवर ईपीएफओने व्याजाची रक्कम हस्तांतरित करण्याबाबत उत्तर दिले आहे. केंद्र सरकारने सध्या सुरू असलेल्या आर्थिक वर्षासाठी पीएफवर 8.1 टक्के व्याज निश्चित केले आहे. 


लवकरच खात्यावर जमा होणार व्याज


ट्विटरवर एका युजरने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ईपीएफओने सांगितले की, व्याजाची रक्कम खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया सातत्याने सुरू असते. खात्यात लवकरच ही रक्कम जमा होईल असे ईपीएफओने म्हटले आहे. पीएफ खातेदारांचे कोणतेही नुकसान होणार नाही, असेही ईपीएफओने स्पष्ट केले आहे. मागील काही वर्षांपासून पीएफ खातेदारांच्या खात्यावर व्याजाची रक्कम वेळेवर जमा होत नाही. त्यासंबंधीच्या तक्रारी सातत्याने समोर येतात. 






पीएफच्या नियमात बदल


पीएफच्या नियमांबाबत सरकारने काही बदल केले आहे. अर्थसंकल्पात पीएफमधील रक्कम काढण्याच्या नियमांबाबत खातेदारांना सरकारने दिलासा दिला होता. या नव्या नियमांनुसार,  आता, पीएफ खात्यात जमा झालेल्या रक्कमेवर टीडीएस 30 टक्क्यांहून 20 टक्के करण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयाचा फायदा पॅन कार्ड क्रमांक अपडेट न केलेल्या खातेदारांना होणार आहे. पीएफ खात्यात पॅन कार्डची माहिती न दिलेल्या खातेदारांना EPFO मधून रक्कम काढल्यास 30 टक्के टीडीएस भरावा लागत होता. 


सर्वात कमी व्याज


मार्च 2022 मध्ये पीएफ खात्यात जमा असलेल्या बचतीवर 8.5 टक्के व्याज कमी करून 8.1 टक्के इतका करण्यात आला. याआधी 1977-78 मध्ये व्याज दर 8 टक्के इतका होता. त्यानंतर पीएफ खात्यातील बचतीवर 8.25 टक्के अथवा त्याहून अधिक व्याज दर होता. वर्ष 2018-19 मध्ये पीएफवरील व्याज दर 8.65 टक्के, 2017-18 मध्ये 8.55 टक्के, 2016-17 मध्ये 8.65 टक्के आणि आर्थिक वर्ष 2015-16 मध्ये 8.8 टक्के व्याजदर मिळत होता. 


कर्मचाऱ्याच्या पगारातून 12 टक्क्यांची कपात करून EPF खात्यावर जमा केली जाते. कंपनीकडून कर्मचाऱ्याच्या पगारात केलेल्या कपातीपैकी 8.33 टक्के भाग हा कर्मचारी पेन्शन योजना (EPS) आणि 3.67 टक्के हिस्सा EPF मध्ये जमा करण्यात येतो. 


इतर महत्त्वाची बातमी :