नागपूर : सेवानिवृत्तीनंतरही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समाजोपयोगी उक्रमात सहभागी व्हावे व सामाजिक बांधिलकी जोपासावी, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले. जिल्हा परिषदेच्या कै. आबासाहेब खेडकर सभागृहात 70 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी प्रकल्प संचालक विवेक ईलमे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपुल जाधव, प्रमिला जाखलेकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मनोज गोस्वामी, कार्यकारी अभियंता सुभाष गणोरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, शिक्षणाधिकारी प्राथमिक रोहिणी कुंभार उपस्थित होते.
एकवर्षात 400 पेंशन प्रकरणापैकी 95 टक्केच्यावर सेवानिवृत्ती प्रकरण निकाली काढण्यात जिल्हा परिषदेने यश मिळविले आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले. जवळपास पाच टक्के प्रकरणे न्यायालयीन, अधिसंख्य पदाचे प्रकरण, सेवापुस्तकात त्रुटया असलेले, सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून सहकार्य न मिळाल्याने प्रलंबित प्रकरणे सुध्दा निकाली काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. याशिवाय सेवानिवृत्तीचे प्रकरण निकाली काढण्यासाठी प्रत्येक महिन्यात पेंशन अदालतीचा उपक्रम देखील राबविण्यात येत आहे. या उपक्रमात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना प्रत्यक्षपणे बाजू मांडण्याची संधी देण्यात येते. त्यावेळी लगेच कार्यवाहीचे निर्देश संबंधित विभागास देण्यात येत असल्यामुळे हे प्रकरणे सुध्दा निकाली काढण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.
जुलै 2021 पासून जून 2022 पर्यंतच्या एक वर्षाच्या काळात जवळपास 400 जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना मिळणाऱ्या आर्थिक लाभाचे मंजुरी आदेश, अंशराशीकरण, रजा रोखीकरण, भविष्य निर्वाह निधी मंजुरीचे आदेश व इतर मंजूरी आदेश देवून गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन उच्चश्रेणी लघुलेखक सोहन चवरे यांनी केले. या कार्यक्रमास मोठया संख्येने कर्मचारी उपस्थित होते.
इतर महत्वाच्या बातम्या