अहमदनगर : पीकविमा भरण्यासाठी रांगेत ताटकळणाऱ्या शेतकऱ्यांची गावातील तलाठ्याकडूनही पिळवणूक केली जात आहे. तलाठी कार्यालयात शेतकऱ्यांची उतारा काढण्यासाठी आणि सहीसाठी सर्रास लूट केली जात असल्याचं समोर आलं आहे.


अहमदनगर जिल्ह्यातील जामखेडला उतारा काढण्यासाठी 30 रुपये, सहीला 20 रुपये आणि पीक विमा अर्जासाठी 20 रुपये घेतले जात आहेत. म्हणजेच एका शेतकऱ्याला साधारण किमान 70 रुपये खर्च येत आहे. काही ठिकाणी यापेक्षाही जास्त पैसे घेतले जात असल्याची माहिती आहे.

नियमानुसार या सर्व प्रक्रियेसाठी पंधरा रुपये खर्च येतो. म्हणजेच एका शेतकऱ्याकडून साधारण 55 रुपये जास्त घेतले जात आहेत.

तलाठ्याने गावातील तलाठी कार्यालयात उपस्थित राहून उतारा देणं अवश्यक आहे. मात्र तलाठी जामखेड तालुक्याच्या ठिकाणी आपल्या सोईने थांबतात. त्यामुळे शेतकऱ्यांना उतारा काढण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी जावं लागतं. त्यानंतर पुन्हा गावाजवळच्या बँकेत जावं लागतं. यात ये जा करण्याचा खर्च, तलाठ्याचा खर्च आणि गावाजवळ जाऊन पुन्हा बँकेत उभं रहायचं अशी शेतकऱ्यांची पिळवणूक केली जात आहे.

पीकविमा भरण्याची मुदत संपत आल्यामुळे शेतकऱ्यांची एकच तारांबळ उडाली होती. तहानभूक विसरुन शेतकरी बँकेच्या रांगेत उभे होते. अखेर राज्य सरकारने 5 ऑगस्टपर्यंत पीकविमा भरण्याची मुदतावाढ दिली आहे.