नागपूरः मला किंवा पक्षातील नेत्यांना गाव दत्तक घ्या आणि विकास करा, अशी मागणी स्थानिक नेते मला नेहमी करत असतात. आत्ताही एकाने गावाच्या विकासासाठी गाव आमदार बावनकुळे यांना दत्तक द्या अशी मागणी केली. मात्र तुमच्यात धमक नाही का? असा सवाल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्थानिक नेत्यांना केला. तसेच विकास तुम्ही करा, हवी असलेली सर्व मदत आणि सहकार्य करण्याची जबाबदारी आमची आहे. अशी ग्वाही यावेळी गडकरी (Nitin Gadkari) यांनी धापेवाड्यातील स्थानिक नेत्यांना दिली. सावनेर-धापेवाडा-गौंडखेरी राष्ट्रीय महामार्ग 547ईचे ई-लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते.

प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेल्या धापेवाडा परिसर व एकूणच नागपूर जिल्ह्यात आधुनिक रस्त्यांचे नेटवर्क मजबूत करण्यासाठी आज धापेवाडा, नागपूर येथे 28.88 किमी लांबीच्या व 720 कोटी रुपए किंमत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग 547-ई च्या सावनेर - धापेवाडा - गौंडखैरी सेक्शन चौपदरीकरणाचे खासदार कृपाल तुमाने, माजी मंत्री व आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule), आमदार टेकचंद सावरकर, डॉ. पोतदार, विठ्ठल मंदिराचे ट्रस्टी तसेच अधिकारी व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले. सावनेर - धापेवाडा - गौंडखैरी सेक्शनच्या चौपदरीकरणामुळे परिसरातील अदासा येथील सुप्रसिद्ध गणेश मंदिर व धापेवाडा येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर या स्थळांसाठी यात्रेकरूंना उत्तम कनेक्टिविटी मिळेल. चंद्रभागा नदीवरील नवीन 4-लेन पुलामुळे धापेवाडा येथील ट्रॅफिक जामपासून मुक्तता मिळेल व प्रवास सुरक्षित होईल. प्रदेशातील कृषी व स्थानीय उत्पादनांची मोठ्या बाजारपेठांपर्यंतची पोहोच सुलभ होईल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला. 

ग्रीनफिल्डमुळे वाहतूक समस्या सुटेल

6.2 किमीच्या ग्रीनफिल्ड (Green Field) कळमेश्वर बायपासमुळे कळमेश्वर शहरातील वाहतुक सुरळीत व सुरक्षित होईल. महामार्गावरील रेल्वे उड्डाणपुल, व्हेईक्युलर अंडरपास, उड्डाणपुल व ओव्हरपासच्या प्रावधानांमुळे परिसरातील वाहतूक सुरळित व सुरक्षित होण्यास मदत होईल. गोंडखैरी व चिंचभवन भागातील लॉजिस्टिक व इंडस्ट्रीयल पार्कमध्ये वृद्धी होईल. तसेच भोपाळ, इंदोर येथून मुंबई, हैदराबाद ला ये-जा करणाऱ्या अवजड वाहतुकीपासून नागपूर शहराला मुक्तता मिळेल. नागरिकांचा प्रवास सुरक्षित होईल व वेळेची बचत होईल. आजच्या लोकार्पण कार्यक्रमादरम्यान गोंडखैरी ते सावनेर सेक्शनमध्ये लाईट लावण्यासाठी 9 कोटी रुपये तसेच पुलाच्या सौंदर्यीकरणासाठी 40 लाख रुपयांच्या निधीला मंजूरी देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली महामार्ग बांधणीतून नागपूर जिल्ह्याच्या प्रगती आणि विकासाचा मार्ग सूकर करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, असेही यावेळी गडकरींनी सांगितले.