सोलापूर : सत्कारासाठी हार, शाल, फेटा नको त्याऐवजी रोख पैसे द्या, अशी विनंती राज्याचे कामगार मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली आहे. पालकमंत्री म्हणून निवड झाल्यानंतर वळसे पाटील पहिल्यांदाच दोन दिवसीय सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. पालकमंत्री सोलापुरात येताच कार्यकर्त्यांनी मोठ्या जोशात त्यांचे स्वागत केले. तर सरकारी अधिकाऱ्याने देखील पुष्पगुच्छ हार देऊन त्यांचे स्वागत केले. मात्र सत्कारासाठी हार, शाल, फेटा न देता रोख रक्कम द्या अशी विनंती वळसे-पाटील यांनी केली.

मागील अनेक वर्षांपासून मी कधीही फेटा बांधत नाही. फेट्याच्या बदल्यात मी रोख पैसे घेतो. या फेट्यातून मिळणारी रक्कम सरकारी रुग्णालयातील रुग्णांसाठी खर्च करतो, असं कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले. तसेच अशाप्रकारच्या सत्काराला टाळल्याने वर्षाला 8 ते 10 लाख रुपये मिळत असल्याची माहिती पालकमंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे त्यांच्या या कार्याचे कौतुक होत आहे. मोठे मोठे सत्कार करुन घेणाऱ्या राजकीय नेत्यांसमोर राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी एक नवा आदर्श ठेवला आहे.


 दरम्यान दिलीप वळसे पाटील हे शनिवारी सकाळी सोलापुरात दाखल झाले. पहिल्यांदाच सोलापुरात आल्याने त्यांनी सोलापूरतल्या सर्व प्रमुख देवस्थानचे दर्शन घेतले. प्रारंभी पंढरपुरात विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर ग्रामदैवत सिद्धरामेश्वराची आरती वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आली तर मुस्लिम समाजातील प्रसिद्ध शाहहुजूर अली दर्गाह येथे देखील त्यांनी भेट दिली. सोलापूरमधील मार्कंडेय मंदिराचेही त्यांनी दर्शन घेतले.



कोरेगाव भीमा दंगलीचा तपास एनआयए करणार असेल तर या पूर्वीच का केला नाही असा सवाल वळसे पाटील यांनी केला आहे. तसेच, केंद्र सरकार राज्य सरकारवर कुरघोडी करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.