धुळे :  धुळे (Dhule News) अवधान एमआयडीसीला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावात केवळ तीन एमसीएफटी इतकाच मृत साठा शिल्लक आहे.त्यामुळे एमआयडीसीतील 400 लहान मोठे उद्योग पाण्याअभावी बंद पडले आहेत.  उद्योगांना पाणीपुरवठा करण्यासाठी तलावात उपलब्ध मृतासाठी आता डबल पंपिंग करून उचलण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येणार आहे.  परिणामी एमआयडीसीतील अर्थचक्र ठप्प झाले आहे.


धुळे शहराजवळील अवधान एमआयडीसीला (MIDC)  पाणीपुरवठा करणाऱ्या तलावाची संपूर्ण मदार ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात काही मोजके दिवस पाण्याच्या काटकसरीने वापरण्यासाठी कठीण असतात मात्र गेल्या वर्षी कमी पाऊस झाल्याने हा तलाव पूर्ण क्षमतेने भरलेला नाही यामुळे यंदा तलाव लवकर आटला आहे.  तलावात आता मृत साठा शिल्लक आहे त्यामुळे एमआयडीसीमध्ये पिण्यासाठी देखील पाणी नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एमआयडीसीतील लहान-मोठे असे सुमारे 400 उद्योग पाण्याअभावी बंद पडले आहेत. जेव्हा पाऊस येईल त्यातून तलावात पाणी साठेल तेव्हा पाणीपुरवठा केला जाईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.


धुळ्यातील तलावाची मदार ही पावसाच्या पाण्यावर


धुळे औद्योगिक क्षेत्रासाठी एकमेव जलस्त्रोत म्हणून एमआयडीसी तलाव ओळखला जातो.  या तलावाची मदार ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते मात्र यंदा तलाव लवकर आटल्याने एमआयडीसी मधील सरासरी 400 उद्योग बंद पडले असून त्यामुळे कामगारांकडेही मोठे संकट उभे राहिले आहे. परिणामी अर्थचक्र देखील ठप्प झाले असून या संदर्भात गेल्या काही दिवसांपासून उद्योजक औद्योगिक पाण्यासाठी लढा देत आहेत.  मात्र पदरी यश येत नसल्याने जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाची असलेली ओळख पुसटशी होण्याची भीती देखील व्यक्त होऊ लागली आहे. 


तलावात केवळ तीन ते साडेतीन टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक


एमआयडीसीला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावात केवळ तीन ते साडेतीन टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक असून पाऊस वेळेवर न झाल्यास हे संकट अधिक वाढण्याची शक्यता देखील निर्माण झाली आहे. सद्यस्थितीत एमआयडीसीला पुढील दहा दिवस पुरेल इतकाच जलसाठा सध्या शिल्लक असल्याची माहिती एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता नितीन पाटील यांनी दिली आहे. 


हे ही वाचा :


मान्सून आला, पण नाशिककरांना जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम, 1 हजाराहून अधिक गाव-वाड्यांत भीषण पाणीटंचाई