धुळे : दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत (Shiv Sena) मोठा बंड झाला. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे 40 आमदारांना घेऊन भाजप (BJP) सोबत सत्तेत गेले. आता शिवसेना फुटीवेळी शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना गुंगीचं औषध दिले होते, असा खळबळजनक दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे.  


शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांनी याआधी 'मला इंजेक्शन देऊन सुरतला नेलं होतं आणि जीवे मारण्याचा प्रयत्न झाला, दावा केला होता. यानंतर आता संजय राऊत यांनी दावा केला आहे. संजय राऊत हे आज धुळे दौऱ्यावर आहेत. आज पत्रकार परिषदेत त्यांनी गंभीर आरोप केला.


संजय राऊतांचा खळबळजनक दावा 


संजय राऊत म्हणाले की, सुरतमार्गे गुवाहाटीला गेलेल्या अनेक आमदारांना खाण्यातून गुंगीचे औषध दिले गेले. नितीन देशमुख यांना मारण्याचा प्रयत्न झाला ते हॉस्पिटलमधून परत आले. काही आमदार हे पाच-सहा दिवस विशिष्ट प्रकारच्या गुंगीत होते. त्या हॉटेलच्या किचनचा ताबा या लोकांनी घेतला होता. आमदारांचे म्हणणे होते की, आम्हाला खाण्यातून आणि पेयाद्वारे काही तरी दिले जात होते. सात-आठ दिवस आम्हाला काहीच कळले नाही. हे सिद्ध करण्यासाठी आमचेकडे पुरावे नाहीत. पण त्यावेळी आमदारांशी बोलताना आम्हाला जाणवायचं की, त्यांची मानसिक स्थिती बरोबर नाही. ते गुंगीत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.  


व्होट जिहाद फेक निगेटिव्ह


ते पुढे म्हणाले की, व्होट जिहाद हा प्रकार फेक निगेटिव्ह असून आरएसएस आणि भाजप सेट करीत आहेत. भाजपच्या दृष्टीने निवडणूक हरल्या की व्होट जिहाद, एखाद्या मतदारसंघात मुस्लिमांनी त्यांना मतदान केलं की तो व्होट जिहाद होत नाही का? या देशांमध्ये सर्व जाती धर्माचे मतदार आहेत. त्यांना मतदानाचा अधिकार असून तुम्ही त्यांचा व्होटिंग राईट्स काढला आहे का? इतरांनी मोदींना मतदान केले तेव्हा तो व्होट जिहाद नव्हता. मात्र, तुमच्या विरोधात मतदान केले तेव्हा तो व्होट जिहाद झाला का? जे मोदींना मतदान करतात तेच मतदार आहेत बाकीचे नाहीत का? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. 


संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल


पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पोहरादेवीच्या दौऱ्यावर आले होते. तेथील आमदार इंद्रजित नाईक यांना कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यात आलेले नव्हते. याबाबत संजय राऊत म्हणाले की, आमचे खासदार संजय देशमुख यांना देखील आमंत्रण दिलेले नाही. कोट्यावधी रुपये खर्च करून सरकारी कार्यक्रमासाठी मोदी या ठिकाणी येतात ते भाजपचा प्रचार करण्यासाठी येतात का? तुम्ही प्रधानमंत्री संपूर्ण देशाचे आहात एका पक्षाचे नाही. जर तुम्ही तुमच्या पक्षाच्या प्रचाराला येणार असाल तर पंतप्रधान पदाचे जोडे दिल्लीला काढा. सगळी यंत्रणा सरकारची वापरायची आणि प्रचार भाजपचा करायचा. निवडणूक आयोगाने या संदर्भात भारतीय जनता पक्षावर गुन्हा दाखल केला पाहिजे. सरकारी पैशांनी पंतप्रधान पक्षाचा प्रचार करीत आहेत. त्या भागातील लोकप्रतिनिधींना व्यासपीठावर बोलावत नाही. ही भाजपाची दादागिरी आहे. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान नसून भाजपमधील एका गटाचे पंतप्रधान आहेत, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे.  


आणखी वाचा


Narendra Modi : बंजारा समाजाप्रती काँग्रेसची कायम अपमानजनक नीती; पोहरादेवीच्या कार्यक्रमातून पंतप्रधान मोदींचा घणाघात