Navratri 2022: धुळे शहरातील खानदेश कुलस्वामिनी आणि महाराष्ट्रातील पाचवे शक्तिपीठ अशी ओळख असणारी श्री एकवीरा देवी महाराष्ट्र गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यात प्रसिद्ध आहे. या एकवीरा देवी मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून मंदिर प्रशासनाच्या विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे


खानदेश कुलस्वामिनी आणि महाराष्ट्रातील पाचवे शक्तिपीठ श्री एकवीरा देवी ही महाराष्ट्रातसह गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यातील भाविकांची कुलस्वामिनी आहे. मंदिरात वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यासोबतच शारदीय नवरात्रोत्सवाचे देखील विशेष महत्त्व असून सोमवारी होणाऱ्या घटस्थापनेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला मंदिरात सुरुवात होणार आहे. यानिमित्त मंदिर प्रशासनाच्या वतीने तयारी पूर्ण करण्यात आली असून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी पहाटे घटस्थापना झाल्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात येईल. यानंतर नऊ दिवस विधिवत पूजा, कुमारीका पूजन, कुंकुमार्चन तसेच देवीची रथयात्रा, होमहवन, असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. मंदिर प्रशासनाच्या वतीने मंदिर परिसरात भव्य मंडप उभारण्यात आला आहे. 


भक्तनिवासाचे होणार लोकार्पण


एकविरा देवी मंदिर ट्रस्टच्या वतीने भाविकांसाठी उभारण्यात आलेल्या भक्ता निवासाचे करवीर पिठाचे शंकराचार्य यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. महाराष्ट्रासह मध्य प्रदेश गुजरात राज्यातून येणाऱ्या भाविकांची राहण्याची उत्तम सोय व्हावी यासाठी हे भक्तनिवास उभारण्यात आले आहे.


सीसीटीव्ही कॅमेराची असेल नजर


शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त 24 तास मंदिर भाविकांसाठी खुले असणार आहे. या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून मंदिर परिसरात पोलीस प्रशासनाच्या वतीने कडेकोट बंदोबस्त देखील असणार आहे.


कोरोनाच्या 2 वर्षानंतर होणार उत्सव
 
दरम्यान, गेल्या दोनवर्षांपासून कोरोना संकटामुळे राज्यभरात विविध सण साजरे करण्यावर निर्बंध घालण्यात आले होते. मात्र आता कोरोनाच्या 2 वर्षानंतर नवरात्र उत्सव होत असून यामुळे भाविकांची गर्दी होणार असल्याने मंदिर प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिराचा परिसर उजळून निघाला आहे. यामुळेच यंदाचा नवरात्रोत्सव धुमधडाक्यात साजरा होणार असल्याचं बोललं जात आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Maharashtra Politics : मंत्री तानाजी सावंतांची जीभ घसरली; विरोधकांवर खालच्या पातळीवर टीका
अमित शाह यांना आव्हान देणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे, आशिष शेलार यांचा ठाकरेंना टोला