धुळे : तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणावर मोबाईलच्या वापराचे प्रमाण वाढले आहे. यात शाळकरी विद्यार्थी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग असल्याचे पाहायला मिळत आहे. मोबाईलच्या व्यसनात हरकत चाललेली तरुणाई विविध आजारांचे बळी ठरत आहे. यातून सायकोसेस सारखा धोका बळावत असून धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात राहणारा एक वीस वर्षीय तरुण सध्या मानसिक आजाराने ग्रस्त झाला आहे. शहरातील एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असून काल-परवापर्यंत शहरांपुरते मर्यादित असणारे हे संकट आता ग्रामीण भागात देखील पोहोचले आहे. 


कोरोनाच्या दोन वर्षाच्या काळात शाळा, महाविद्यालये बंद असल्याने शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला होता. अनेक विद्यार्थ्यांना मोबाईलचे व्यसन लागले असून यातून विविध घटना घडल्याचे समोर आले आहे.


धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील एका खेडेगावातील वीस वर्षाचा तरुण फ्री फायर गेमच्या मोहाने मानसिक आजाराचा शिकार झाला आहे. सध्या त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या तरुणाचे आई-वडील शेतकरी असून हा वीस वर्षे तरुण अचानक घरात हाताच्या इशाराने बंदूक चालवण्याचे हावभाव करत होता, हाच प्रकार गावात देखील सुरू होता. या प्रकाराने भयभीत झालेल्या  तरुणाच्या आईवडिलांनी त्याला जवळच्या खासगी डॉक्टरांना दाखवले. त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रात आणइ तिथून शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 


आजाराचे कारण लक्षात आल्यानंतर संबंधित तरूणाला उपजिल्हा रुग्णालयातून धुळे शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले  आहे. सध्या धुळे शहरातील एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर अतिदक्षता कक्षात उपचार सुरू आहेत. 


सायकोसिस म्हणजे काय? 
हा तरुण फ्री फायर गेमच्या आहारी गेल्याने आपण बंदूक चालवत असल्याचा त्याला भास होत आहे. समोर असलेला प्रत्येक व्यक्ती हा शत्रू असून त्याला बंदुकीने मारले पाहिजे म्हणून तो असे कृत्य करीत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. मोबाईलच्या अतिवापराने झालेली तरुणाची ही अवस्था आई वडिलांना अस्वस्थ करणारी असून काल-परवापर्यंत शहरांपुरती मर्यादित असणारी ही समस्या आता ग्रामीण भागात देखील  पोहोचल्याने यातून आपल्या पाल्यांचा बचाव करण्याचे आवाहन पालकांच्या समोर उभे राहिले आहे. 


धुळे जिल्ह्यातील हा वीस वर्षे तरुण सायकोसिस आजाराचा बळी ठरल्याची ही पहिलीच घटना असून मोबाईलच्या अतिवापराने निद्रानाश तसेच विविध आजार जडत असतात यामुळे मुलांच्या मोबाईल वापरावर नियंत्रण ठेवणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.