धुळे : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) जीवाचं रान करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी उपोषण मागे घेतले असलं तरीही अद्याप महाराष्ट्रात (Maharashtra) ठिकठिकाणी शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरूच आहे. शासनाने वेळ मागितला म्हणजे आरक्षण मिळालंच पाहिजे, आंदोलन थांबलं म्हणजे आक्रोश थांबला असं होत नाही, त्यामुळे सरकारने गांभीर्याने या प्रश्नाकडे बघावं, मनोज जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा द्यावी, अशी मागणी धुळे (dhule) शहरातील सकल मराठा समाज बांधवांकडून करण्यात आली आहे. 


गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मराठा समाज बांधवांच्या आंदोलनामुळे (Maratha Andolan) अवघा महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. त्यातच सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांची भेट घेतली. सरकारने मनोज जरांगे यांना आश्वासन देत पुन्हा दोन महिन्यांचा वेळ मागून घेतला असून त्यानंतर मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतले आहे. सध्या ते उपचार घेत आहेत. दुसरीकडे मराठा समाज बांधवांचा साखळी उपोषण सुरुच असून धुळ्यात आज मोर्चा काढण्यात आला. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आमरण उपोषण आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी करत धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन देण्यात आले. 


मराठा समाजाला आरक्षण (Maratha Aarkshan) देण्यासह विविध मागण्यांसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे गेल्या नऊ दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणास बसले होते. मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यासह विविध मागण्यांसाठी त्यांचे हे आंदोलन सुरू होते. तसेच त्यांनी मागील महिन्यात देखील आपल्या मागणीसाठी आमरण उपोषण आंदोलन सुरू केले होते. 40 दिवसाच्या अल्टिमेटमनंतर देखील आरक्षणाबाबत कुठलाही ठोस निर्णय न झाल्याने त्यांनी पुन्हा राज्य सरकार विरोधात आमरण उपोषण आंदोलनाचे हत्यार उपसले होते. अखेर काल राज्य शासनाच्या मध्यस्थीनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या जीविताला धोका असून त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी धुळे जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे. 


आरक्षणप्रश्नी सरकार कामाला लागलं? 


दरम्यान जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे आभार मानले. तसेच सरकार पुढच्या दोन महिन्यात ठरवलेलं सगळं काम पूर्ण करेल. मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारं आणि टिकणारं आरक्षण देईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. त्याच प्रमाण ज्यांच्या कुणबी नोंदी आढळून येतील त्यांना तातडीने कुणबी प्रमाणपत्र लगेच देण्यात येईल असं देखील मनोज जरांगे यांनी म्हटलं. पण जरांगे यांनी सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली आणि त्यांच्या याच मागणीवर सरकार कामाला लागलं आहे. 


इतर महत्वाची बातमी : 


Maratha Reservation : लातूरमधील उपोषणस्थळी ठेवला तरुणाचा मृतदेह, मागणी मान्य होईपर्यंत अंत्यसंस्कार न करण्याचा ग्रामस्थ आणि नातेवाईकांचा निर्णय