धुळे : राज्यातील अनेक जिल्ह्यात वळवाच्या पावसाची (Rain) हजेरी लागली असून काही ठिकाणी वीजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामध्ये, शेतकऱ्यांच्या पिकांना, फळबागांना फटका बसत असून बाजार समितीत उघड्यावर असलेलं धान्यही पावसात भिजल्याने नुकसान झाल्याचे काही व्हिडिओ समोर आले आहेत. आता, धुळे (Dhule) जिल्ह्यातून एक महत्त्वाची बातमी समोर आली असून चक्क येथील शिक्षण विभागाच्या महत्त्वाच्या फाईली पावसाच्या पाण्याने भिजल्या असून त्या कार्यालयासमोरील पटांगणात उन्हात वाळू घातल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, या पावसाने शिक्षण विभागाच्या (Education) कार्यालयाची दाणादाण उडवून दिली असून कार्यालयाच्या देखभाल दुरुस्तीची गरज व्यक्त होत आहे. यासंदर्भात शिक्षणाधिकारी मनीष पवार यांनी वरिष्ठांकडे पत्रव्यवहार केल्याचंही म्हटलं आहे. 

धुळे शहरासह परिसरात रविवारी रात्री मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसाचा फटका शहराला मोठ्या प्रमाणावर बसला असून ठिकठिकाणी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालं होतं. तर, काहींच्या घरात, दुकानात पाणी शिरल्याचंही पाहायला मिळालं. या अवकाळी पावसाचा फटका धुळे शिक्षण विभागाच्या कार्यालयाला देखील बसला असून कार्यालयास लागलेल्या गळतीमुळे शिक्षण विभागातील विविध महत्त्वाच्या फाईली पावसाच्या पाण्याने ओल्या झाल्या आहेत.

शहरातील शिक्षण विभागाच्या कार्यालयात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामध्ये, शिक्षण विभागातील महत्त्वाच्या फाईल्स पूर्णपणे या पाण्यामध्ये भिजल्याने ओल्या झाल्या असून आता त्या फाईल वाळवण्याची वेळ शिक्षण विभागावर आली आहे. या ओल्या झालेल्या फाईल कार्यालयाच्या बाहेर वाळत घालण्यात आल्या आहेत. तर, शिक्षण विभागाच्या कार्यालयाची दुरुस्ती करण्याची वेळ आली असून या संदर्भात आपण जिल्हा परिषदेकडे देखील कार्यालयाच्या दुरुस्तीसाठी पत्रव्यवहार केला असल्याची माहिती शिक्षण अधिकारी मनीष पवार यांनी दिली आहे.

आजपासून पावसाचा अंदाज

राज्यात आजपासून मुसळधार पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. कोकण विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात आज पाऊस पडेल असे हवामान विभागाचा अंदाज आहे. तर मंगळवारपासून मराठवाडा भागात पाऊस सुरु, होईल असा ही अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मुंबईत रविवारी रात्रीपासून पावसाची (Rain News) रिपरिप सुरु आहे. सोमवारी पहाटेपासूनही मुंबई पावसाच्या (Mumbai Rain) तुरळक सरी बरसत आहेत. तसेच आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली आहे. त्यामुळे आज मुंबईत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. या पावसामुळे मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. (Maharashtra Weather news)

हेही वाचा

आपला विजय झालेला नाही, शस्त्रसंधी झालीय, भारतीय जवानांच्या प्राणत्यागानंतरचा जल्लोष मनाला वेदना देणारा; अमित ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना पत्र