Dhule Farmer Suicide : शेतीसाठी घेतलेल्या कर्जाची (Loan) परतफेड करता येत नसल्याच्या विवंचनेतून 45 वर्षीय शेतकऱ्याने (Farmer) विहिरीत उडी घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना धुळे (Dhule) जिल्ह्यात घडली आहे. शिंदखेडा तालुक्यातील वाडी गावात काल (11 जानेवारी) सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत शिंदखेडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. 


कर्ज फेडण्याच्या विवंचनेतून विहिरीत उडी घेऊन आयुष्य संपवलं


याप्रकरणी शिंदखेडा पोलीस स्टेशनात मोहनसिंग गिरासे रा.वाडी यांनी दिलेल्या माहितीनुसार धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील वाडी गावातील शेतकरी लोटनसिंग इंद्रसिंग गिरासे यांची वाडी शिवारात 3 एकर शेती आहे. शेतकरी लोटनसिंग गिरासे यांनी सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकेच्या मालपूर शाखेतून कृषी कर्ज घेतले होते, ते कर्ज फेडण्याच्या विचाराने तणावात आणि विंवचनेत होते. काल सायंकाळच्या सुमारास शेतकरी लोटनसिंग गिरासे यांनी गावाबाहेरील दिवान गिरासे यांच्या शेतातील खोल विहिरीत उडी घेत आपली जीवनयात्रा संपवली.


शिंदखेडा पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद


या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता लोटनसिंग गिरासे हे खोल विहिरीतील पाण्यावर तरंगत असल्याचे दिसून आले. लोटनसिंग गिरासे यांना विहिरीबाहेर काढून शिंदखेडा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉ सुशांत गवांदे यांनी तपासून लोटनसिंग गिरासे यांना मृत घोषित केले. या संदर्भात शिंदखेडा पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


धुळ्यात जून ते ऑक्टोबर 2022 दरम्यान 32 शेतकऱ्यांच्या आत्महत्या


दरम्यान धुळे जिल्ह्यात मागील वर्षी सहा महिन्यात तब्बल 32 शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवल्याचं समोर आलं आहे. पिकांचं होणारं नुकसान आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून जून ते ऑक्टोबर या सहा महिन्यांच्या कालावधीत धुळे जिल्ह्यातील 32 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यामध्ये शिंदखेडा तालुक्यातील सर्वाधिक 14 शेतकऱ्यांचा समावेश असून धुळे तालुक्यातील बारा तर शिरपूर तालुक्यातील तीन शेतकऱ्यांचा समावेश आहे. जून आणि सप्टेंबर या महिन्यात प्रत्येकी आठ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. तर जुलै महिन्यात पाच, ऑगस्टमध्ये सहा, ऑक्टोबर महिन्यात पाच शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. दरम्यान जिल्ह्यात 32 शेतकऱ्यांनी आत्महत्या करुन देखील आर्थिक मदतीसाठी केवळ दोन प्रस्ताव पात्र ठरले.


हेही वाचा


धक्कादायक आकडेवारी! गेल्यावर्षी मराठवाड्यातील तब्बल एक हजारपेक्षा अधिक शेतकऱ्यांची आत्महत्या