Dhule Crime News : धुळे जिल्ह्यात (Dhule District) साक्री तालुक्यातील (Sakri Taluka) पिंपळनेर पोलिसांना गोवंश तस्करी रोखण्यात यश आलं आहे. तब्बल 12 लाख 91 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आलं आहे. तसेच, पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. धुळे पोलिसांनी केलेल्या या कारवाईचं पिंपळनेर तालुक्यातून प्राणी मित्रांकडून कौतुक करण्यात येत आहे. 


धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे आणि त्यांच्या पथकानं गोवंश तस्करीवर मोठी कारवाई केली आहे. पोलिसांना 19 गोवंशला जीवनदान देण्यात यश आलं असून या प्रकरणात 12 लाख 91 हजारच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 


धुळ्यातील पिंपळनेर पोलिसांना गोवंश तस्करीसंदर्भात गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे रात्री पेट्रोलिंगवर असणाऱ्या पथकाला सतर्क करण्यात आलं. एक टाटा कंपनीची आयशर गाडीतून गोवंश तस्करी करण्यात येत असून तात्काळ कारवाई करण्याचे आदेश पथकाला देण्यात आले. 


पिंपळनेर ते सटाणा रोडवर शेलबारी घाटात, सरकार हॉटेलच्या समोरुन जाणाऱ्या रोडवर वळण रस्ता असलेल्या ठिकाणी पोलिसांनी सापळा लावला. काही वेळातच तिथे टाटा कंपनीची आयशर गाडी आली. पोलिसांनी बॅटरी मारुन वाहनचालकाला थांबण्याचा इशारा दिला. पण वाहनचालकानं गाडी न थांबवता, भरधाव वेगानं गाडी पळवू लागला. पोलिसांनी पाठलाग करुन गाडी थांबवली. या गाडीच्या मागच्या बाजूला एक लाकडी आणि दोन लोखंडी पट्ट्या लावलेल्या. त्यावर चढून बॅटरी चालू करुन पाहीलं आणि सदर गाडी चेक केली. त्यावेळी गाडीमधून गोवंशची तस्करी होत असल्याचं पाहायला मिळालं. सदर ठिकाणी रहदारी असल्यानं आणि अंधार असल्यानं पोलिसांनी गाडी ताब्यात घेत पिंपळनेर पोलीस स्टेशनला आणली आणि गाडीची झडती घेतली. 


गाडीत 19 गोवंश जनावरं आढळून आली. त्यांची अंदाजीत किंमत 2 लाख  91 हजार रुपये इतकी असून ताब्यात घेतलेल्या वाहानाची किंमत अंदाजे 10 लाख रुपये इतकी आहे. त्यामुळे या कारवाईत 12 लाख 91 हजार रुपयांचा मुद्दमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस कॉन्स्टेबल पंकज दत्तात्रय वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी ड्रायव्हर एकलाक अजिज शेख वय 45 वर्ष याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


धक्कादायक! कौटुंबिक वादातून तिघांनी धारदार शस्त्रानं तरुणाचं लिंग कापलं, मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल