Dhule Accident news: साक्री तालुक्यातील गणेशपूर येथे कांदे भरलेला एक ट्रॅक्टर ट्रॉलीसह विहिरीत कोसळल्याची घटना समोर आली आहे. रविवारी दुपारी ही घटना घडली. या ट्रॅक्टरवर खेळत असलेली तीन लहान मुलं ट्रॉलीसोबत विहिरीत कोसळल्याची (Dhule Accident news) प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यापैकी एका बालकाला वाचवण्यात यश आले असून दोन लहान मुलींचा शोध घेण्यासाठी रविवारी रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते. घटनेची माहिती मिळताच साक्री पोलीस (Sakri Police) ठाण्याचे पीआय दीपक वळवी व त्यांचे पथक घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. गावकऱ्यांच्या मदतीने पोलीस प्रशासनाकडून बेपत्ता बालिकांचा शोध घेण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. (Dhule Marathi news)
प्राथमिक माहितीनुसार गणेशपूर शिवारात कांदा चाळीतील कांदा ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये भरण्याचे काम सुरु होते. काम करणाऱ्या मजुरांची काही मुले ट्रॅक्टरवर खेळत होते. खेळताना अचानकपणे ट्रॅक्टर सुरु झाला व काही अंतरावर असलेल्या विना कठड्याच्या अंदाजे 60 फूट खोल पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरीत पाच वर्षापेक्षा कमी वयाच्या चिमुकलींसह कांद्याने भरलेले ट्रॅक्टर-ट्रॉली कोसळले. खुशी दाजू ठाकरे (वय 3 वर्ष), ऋतिका संदीप गायकवाड (3 वर्ष) हे खोल विहिरीत पडल्याने पाण्यात बेपत्ता झाले. तर परी संदीप गायकवाड या दोन वर्षीय चिमुकलीला वाचवण्यात गावकऱ्यांना यश आले. मात्र, पाच तासांपासून ट्रॅक्टरसोबत पाण्यात गेलेल्या बालिकांचा अद्याप शोध न लागल्याने हळहळ व्यक्त होत आहे. बेपत्ता बालिकांचा शोध घेण्यासाठी 60 फुटापर्यंत असलेले पाणी पंपाच्या सहाय्याने उपसण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. मदत कार्यासाठी घटनास्थळी जेसीबी मागवण्यात आले आहे. साक्री पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक वळवी यांच्या नेतृत्वात मदतकार्य व शोधकार्य गावकऱ्यांच्या सहकार्याने रात्री उशिरापर्यंत सुरू होते. या ठिकाणी गणेशपूर सह परिसरातील दिघावे, कासारे, छाईल, सायने या गावातील ग्रामस्थ मदत कार्यासाठी सरसावले आहेत.
आणखी वाचा
सप्तशृंग गडावर निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला, कारचा भीषण अपघात, सहा जणांचा जागीच मृत्यू