Dhule News धुळे : शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) वारकऱ्यांना विकत घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे वक्तव्य केले होते. यावर वारकरी चांगलेच संतप्त झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. धुळ्यात खानदेश वारकरी सेवा मंडळाच्या तसेच भाजपा अध्यात्मिक आघाडीच्या (BJP Adhyatmik Aghadi) वतीने श्रीराम मंदिरासमोर वारकऱ्यांनी एकत्र येत संजय राऊत यांच्या पोस्टरला जोडो मारो तसेच टाळ मारो आंदोलन केले.
शिंदे सरकारने आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi 2024) राज्यातील दिंड्यांना प्रत्येकी 20 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला. यावरून संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला होता. ते म्हणाले की, सर्वत्र पैशाची मस्ती सुरू आहे. आता तर वारकऱ्यांना लाच देण्याचा प्रयत्न सुरू आहे असे वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होते.
आषाढी एकादशीच्या दिवशी आंदोलनाचा इशारा
आता या विधानावरून खानदेश वारकरी सेवा मंडळ चांगलेच आक्रमक झाले आहे. संजय राऊत यांच्या पोटात वारकऱ्यांना वीस हजार रुपये दिले म्हणून पोटसूळ उठला आहे. म्हणून ते असे वक्तव्य करीत असतात. संजय राऊत यांनी वारकऱ्यांची माफी मागावी अन्यथा आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरमध्ये मोठ्या स्वरूपाचे आंदोलन केले जाईल, असा इशारा खानदेश वारकरी सेवा मंडळाचे पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला आहे.
संजय राऊतांनी केलेलं वक्तव्य चुकीचं
दरम्यान, काल त्र्यंबकेश्वर येथून संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले. या सोहळ्यात हजारो वारकरी सहभागी झाले होते. यावेळी वारकर्यांशी संवाद साधला असता त्यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्याबाबत संताप व्यक्त केला. संजय राऊत यांनी केलेले वक्तव्य चुकीचे आहे. अनुदानावर वारकरी अवलंबून नाही. वारकरी लाचार नाही. सरकार अनुदान देत असेल तर ते त्यांच्या खिशातून देत नाही, तो जनतेचाच पैसा आहे. शेकडो वर्षांची परंपरा आम्ही जपतो आहोत. वारकऱ्यांवर बोलणे चुकीचे आहे. सरकार अनुदान देत असेल तर ते त्यांचे कामच आहे. आमचा पैसा टॅक्स घेऊन सरकारला जमा होतो, अशी प्रतिक्रिया यावेळी वारकऱ्यांनी दिली होती.
इतर महत्वाच्या बातम्या