Dhule News : कोरोना महामारीच्या (Corona Pandemic) पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत मृत्यू झालेल्या रुग्णांच्या कर्ज खात्यांची माहिती धुळे जिल्हा सहकार विभागाने मागवली. यातून 53 कोरोनाग्रस्त मृतांकडे तब्बल एक कोटी 17 हजार 904 रुपयांचे कर्ज (Debt) थकल्याची माहिती समोर आली आहे. ही माहिती आता शासनाकडे सादर केली जाणार आहे. त्यानंतर संबंधित कोरोनाग्रस्त मृतांचे कर्ज माफ करावे किंवा वारसांकडून वसूल करावे याचा निर्णय होणार आहे.


53 मृत कर्जदारांकडे एक कोटी 17 हजार 904 रुपयांची थकबाकी


शासनाने दिलेल्या आदेशानुसार जिल्हा सहकार उपनिबंधकांनी जिल्हा मध्यवर्ती बँक नागरी सहकारी बँक आणि नागरी सहकारी पतसंस्थांना पत्र पाठवले होते. त्यात कोरोना काळात मृत झालेल्या कोरोनाग्रस्तांच्या कर्ज खात्यातील थकित कर्जाची माहिती मागवली होती. त्यानुसार 53 मृत कर्जदारांकडे एक कोटी 17 हजार 904 रुपयांची थकबाकी असल्याचे समोर आले आहे. कोरोनाच्या लाटेत मृत झालेल्या कर्जदारांना कर्जमाफी किंवा सवलत देण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही. यामुळे बँकांकडून नियमानुसार वसुलीची कार्यवाही प्रस्तावित आहे. 


कोणत्या तालुक्यातील किती कर्जदारांकडे थकित कर्ज? 


सहकार आयुक्तांनी कोरोनामुळे मृत झालेल्या कर्जदारांची माहिती मागवली. त्यानुसार सहकार विभागाने जिल्ह्यातील सहकारी बँका नागरी सहकारी बँक पतपेढी पतसंस्थांकडून मृत कर्जांची माहिती मागवली. त्यानुसार 53 कोरोनाग्रस्त मृत कर्जदारांनी हे कर्ज घेतल्याचे समोर आले आहे. यात धुळे तालुक्यात 18 कर्जदारांकडे 69 लाख 35 हजार 449, शिरपूर तालुक्यात 32 कर्जदारांकडे 27 लाख 31 हजार 778 रुपये, शिंदखेडा तालुक्यातील कर्जदारांकडे चार लाख 14 हजार रुपयांचे कर्ज थकित असल्याचे समोर आले आहे. 


कोरोना बळींच्या कर्जांच्या संदर्भात धोरण निश्चित नसल्याने वसुलीची प्रक्रिया सुरु 


थकबाकीदार कर्जदारांचे कोरोना काळात निधन झाल्यानंतर कर्जाच्या रकमेच्या वसुलीची चिंता संबंधित बँकांना देखील आहे. कर्जाची वसुली होत नसल्याने काही खाते एनपीएमध्ये गेले आहे. अद्याप कोरोना बळींच्या कर्जांच्या संदर्भात काय धोरण आहे हे निश्चित नसल्याने बँकांच्या नियमानुसार वसुलीची प्रक्रिया देखील सुरु आहे.