धाराशिव : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींनी (Raju Shetti) राज्यातील साखर कारखाने अतिरिक्त साखर जीएसटी न भरताच विकत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. कारखानदार साखरेचं रिकव्हरी कमी दाखवतात, त्यामुळे निर्माण झालेली अतिरिक्त साखर जीएसटी न भरताच स्थानिक बाजारपेठा आणि पाकिस्तानच्या बाजारपेठांमध्ये विकली जाते असेही शेट्टी म्हणाले आहेत. तर, शेट्टी यांनी सहा महिन्यापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील भोगावती साखर कारखान्याचे स्टींग ऑपरेशन केले होते. या स्टींग ऑपरेशनमध्ये जीएसटी न भरलेली 10 टन साखर पकडल्याचा दावा त्यांनी केला आहे. याबाबत राज्याचे साखर आयुक्त, मुख्यमंत्री आणि जीएसटी कमिशनर यांच्याकडे तक्रार देखील करण्यात आल्याचे शेट्टी म्हणाले आहेत. तर, राज्यात पाच हजार कोटींचा साखर घोटाळा झाल्याचा दावा शेट्टी यांनी केला आहे.


दरम्यान यावर बोलतांना राजू शेट्टी म्हणाले की, कोल्हापूरच्या भोगावती साखर कारखान्यातून गेट पास न घेता एक साखरेचा ट्रक बाहेर जात होता. आमच्या पक्षाच्या नेत्यांचे हे सर्व काही लक्षात आले. त्यामुळे आमच्या पक्षाच्या लोकांनी तो ट्रक साखर कारखान्याच्या बाहेर रस्त्यावर अडवला. विशेष म्हणजे तो ट्रक साखर कारखान्यातून बाहेर गेल्याची नोंद नव्हती मात्र, तासाभरापूर्वी आत गेल्याची नोंद होती. याच अर्थ काय?, त्या साखरेचं बील नव्हते, गेट पास नव्हता म्हणजेच रिकव्हरी न दाखवता काढलेली ही साखर होती, असे शेट्टी म्हणाले. 


अखेर तो ट्रक सोडून द्यावा लागला...


दरम्यान, या सर्व प्रकरणाची मी पोलीस जिल्हा प्रमुख यांच्याकडे तक्रार केली होती. मी स्वतः पोलिसांकडे गेलो होतो आणि ही चोरीची साखर असल्याचे सांगितले होते. मात्र, पोलीस म्हणाले की, यासाठी ऑडीटर यांनी तक्रार केली पाहिजे. त्यामुळे आम्ही ऑडीटरला विचारले. पण, कारखान्याने पैसे योग्य खर्च केला की नाही हे तपासण्याचे काम आमचे आहे. तो साखर चोरून विकतो का? हे तपासण्याचे काम आमचे नाही असे ऑडीटर म्हणाला. त्यामुळे मी साखर आयुक्त यांना फोन केला. तर, त्यांनी देखील साखर कारखान्याने एफआरपी प्रमाणे पैसे दिले की नाही हे तपासण्याचे काम आमचे आहे. तो साखर चोरून विकतो का? हे तपासण्याचे काम आमचं नसल्याचे म्हणाले. आम्ही चोरी पकडली, चोर देखील आम्हाला माहित होता. पण, आम्ही काहीच करू शकलो नसल्याने आम्हाला तो ट्रक सोडून द्यावा लागल्याचे राजू शेट्टी म्हणाले. त्यामुळे शेट्टी यांच्या आरोपाने खळबळ उडाली आहे. तसेच साखर कारखान्यातील साखर घोटाळ्याचा मुद्दा देखील पुन्हा एकदा समोर आला आहे. 


Raju Shetti Sting Operation Video : राजू शेट्टींकडून भोगावती साखर कारखान्याचे स्टींग ऑपरेशन 



इतर महत्वाच्या बातम्या: 


Raju Shetti : यंदा FRP पेक्षा 400 रुपये ज्यादा द्या, अन्यथा कारखाना सुरू होऊ देणार नाही; राजू शेट्टींचा इशारा