Rohit Pawar On Shinde Group: मागील काही दिवसांत शिंदे गटात सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा आहे. कोणी मंत्री पदावरून,कोणी पालकमंत्री पदावरून, तर कोणी विकास निधी मिळत नसल्याच्या कारणांवरून नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे शिंदे गटाचे काही आमदार पुन्हा ठाकरे गटात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी उस्मानाबाद येथे पत्रकार परिषदेत बोलतांना मोठं वक्तव्य केले आहे. शिंदे गटात मोठी नाराजी असून, शिंदे गटातील नाराज दहा आमदार आणि इतर पाच असे एकूण 15 आमदार ठाकरे गटात जाण्यास उत्सुक असल्याचं रोहित पवार म्हणाले आहेत. 


दरम्यान यावेळी बोलतांना रोहित पवार म्हणाले की, सत्तेत सहभागी असलेल्या शिंदे गटातील काही आमदार नाराज आहे. तर, शिंदे गटाचे 10 आणि इतर 5 असे एकूण 15 आमदार नाराज आहेत. तर नाराज असलेले हे सर्व आमदार ठाकरेंकडे जाण्यास इच्छुक आहेत. पण त्यांना पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेत घ्यायचे की नाही, हा निर्णय तेच घेतील, असे आमदार रोहित पवार म्हणाले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा शिंदे गटातील नाराजीची चर्चा पाहायला मिळत आहे. 


सर्वकाही आलबेल नाही... 


सध्या राज्यात जे सरकार आहे, ते पक्षांमध्ये गट-तट पाडून निर्माण झाले आहे. त्यामुळे या सरकारला लोकांमधील नाराजीचा विचार करायला वेळ नाही. कारण त्यांच्याच गटातीलच अनेक आमदार नाराज आहेत. शिंदे गटात सर्वकाही आलबेल आहे, असे नाही. शिंदे गटाचे जवळपास दहा आमदार नाराज आहेत. याबाबत माझ्याकडे माहिती आहे. शिंदे गटासह इतर असे एकूण पंधरा आमदार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जाण्यास उत्सुक आहेत. तर, राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह हे शरद पवार यांच्याकडेच राहील, असा आम्हाला विश्वास आहे, असेही रोहित पवार म्हणाले.


शिंदे गटामध्ये कुजबूज 


शिंदे गटामध्ये काही आमदार रोहित पवार यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली होती. यावर बोलताना रोहित पवार म्हणाले की, शिंदे गटांमध्ये सध्या कुजबूज सुरू आहे. लवकरच या संदर्भातल्या काही घटना येत्या काळामध्ये घडणार असल्याचं वक्तव्य रोहित पवार यांनी बीडमध्ये बोलतांना केले आहे. तर, येत्या काळामध्ये शरद पवार यांच्या विचारांचा विजय होईल असा विश्वास देखील रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


शरद पवारांच्या विचारामुळे बीड जिल्ह्याच्या मतदारांनी चार आमदारांना निवडून दिलं : रोहित पवार