धाराशिव : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) चौथ्या टप्प्यात महाराष्ट्राचा दौर करत आहेत. दरम्यान, याच दौऱ्यात ते अनेक ठिकाणी सभा घेत आहे. मात्र, धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यातील एका सभेत अचानक भाषण सुरु असतानाच मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना थोडक्यात भाषण उरकावे लागले. दरम्यान, यावेळी तत्काळ डॉक्टरांनी जरांगे यांची तपासणी केली असून, त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. मात्र, जरांगे आपल्या दौऱ्यावर ठाम असल्याची माहिती मिळत आहे. 


मनोज जरांगे आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान, आज त्यांची लोहारा तालुक्यातील माकणी-करजगाव येथे सभा आयोजित करण्यात आली होती. याच सभेला जात असतांना जरांगे यांची प्रकृती बिघडली होती. उन्हाची तीव्रता जास्त असल्याने सभा रद्द करण्याची काहींनी त्यान विनंती केली. मात्र, जरांगे सभेला उपस्थित राहण्यावर ठाम होते. त्यानुसार, दुपारी सव्वाबारा वाजल्यानंतर मनोज जरांगे हे सभेच्या ठिकाणी दाखल झाले. दरम्यान, भाषण सुरु झाल्यावर त्यांची तब्येत बिघडली. त्यांना उभं राहणं देखील शक्य नव्हते. त्यामुळे जरांगे यांनी बसूनच भाषण केले. 


मंचावरच डॉक्टरांकडून तपासणी...


जरांगे यांची तब्येत बिघडल्याने डॉक्टर देखील दाखल झाले. तसेच, त्यांचे भाषण संपताच सभा मंचावरच डॉक्टरांनी जरांगे यांची तपासणी केली. तसेच त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला. परंतु, जरांगे यांनी पुढेल दौरा करायचा असून, मला थांबता येणार नाही असे सांगितले. तसेच, मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत मी शांत बसणार नाही. आरक्षणाच्या लढाईत जीव गेला तरीही चालेल. आता ही लढाई अंतिम टप्यात आली असून, मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय इंचभरही मागे हटणार नाही, असे जरांगे उपस्थितांना म्हणाले.


आज बीड जिल्ह्यात देखील सभा...


मनोज जरंगे पाटील यांची बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील वाघाळा या ठिकाणी आज संध्याकाळी सात वाजता जाहीर सभा होणार आहे. वाघाळा येथील बैलगाडी मैदानावर सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. ज्या ठिकाणाहून मनोज जरंगे पाटील हे मराठा बांधवांना संबोधित करणार आहेत, त्या ठिकाणी किल्ल्याच्या तटबंदीची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. सभेच्या ठिकाणी महापुरुषांचे मोठमोठे फ्लेक्स लावण्यात आले आहेत. अंबाजोगाई येथे होत असलेल्या या सभेसाठी सर्व समाजातील लोकांनी सहकार्य केले असल्याची माहिती मराठा बांधवांनी दिली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


जिभेला आवरा, मराठ्यांच्या विरोधात बोलू नका अन्यथा... मनोज जरांगेचा इशारा