धाराशिव : रासप अध्यक्ष महादेव जानकरांना (Mahadev Jankar) तुळजा भवानी मंदिरात जाण्यापासून अडवण्यात आल्याची बातमी समोर येत आहे. धाराशिवचे माजी पालकमंत्री तथा माजी कॅबिनेट मंत्री महादेव जानकर दर्शनासाठी तुळजाभवानी देवीच्या मंदिरात गेले होते. मात्र, यावेळी सुरक्षारक्षकांनी त्यांना अडवत गाभाऱ्यात जाण्यापासून रोखले. यावेळी जानकर आणि सुरक्षारक्षकांमध्ये बाचाबाची देखील झाल्याचे समोर येत आहे. त्यामुळे, गाभाऱ्याच्या बाहेरूनच दर्शन घेवुन महादेव जानकर यांना परतावे लागले आहे. 


महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने जनस्वराज्य यात्रा काढण्यात आली आहे. दरम्यान ही यात्रा राज्यभरातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून जात आहे. तर हीच जनस्वराज्य यात्रा धाराशिव जिल्ह्यात पोहचली आहे. यावेळी महादेव जानकर हे आपल्या कार्यकर्त्यांसह तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आले होते. मात्र, दर्शनासाठी मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यापासून त्यांना सुरक्षारक्षकांनी रोखले. तसेच आतमध्ये जाता येणार नसल्याचे जानकर यांना सांगितले. यावरून जानकर आणि सुरक्षारक्षकांमध्ये बाचाबाची देखील झाली. मात्र, सुरक्षारक्षकांनी नाही म्हणजे नाहीच अशी भूमिका घेतल्याने जानकर यांना गाभाऱ्याच्या बाहेरूनच दर्शन घेऊन निघावे लागले. 


जानकर यांच्याकडून नाराजी व्यक्त...


दरम्यान, या सर्व प्रकरणावर महादेव जानकर यांची प्रतिक्रीया आली असून, त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आम्ही जनतेचे सेवक आहोत. मंदिर प्रशासनाने माणसाचा प्रोटोकॉल पाहून त्यांना थांबवले पाहिजे. याच विचार प्रशासनाने करायला पाहिजे. याबाबत मी जिल्हाधिकारी यांना बोलणार आहे. असली मगरूरी आम्ही चालू देणार नाही. आम्ही याच राज्यातील असून, आमची देखील देवी आहे. आज चांगला दिवस असल्याने आम्ही देखील वाद घातला नाही आणि बाहेरून पूजा केली. असे करणे योग्य नसून, मोठ्या माणसाचा मान ठेवला पाहिजे. त्यामुळे माणसे पाहून नीट वागले पाहिजे. सत्ता येत असते आणि जात असते. उद्या आम्ही देखील सत्तेत असणार आहे. त्यावेळी हे कुठे जाणार आहे, परत पाया पडणार. त्यामुळे सुरक्षारक्षक यांना दोष देणार नाही, पण यांना कोणी आदेश दिला त्यांना कसे बाजूला ठेवायचं याची आम्ही काळजी घेऊ, असे जानकर म्हणाले. 


संभाजीराजेंना देखील रोखले होते....


विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी असाच प्रकार संभाजीराजे यांच्यासोबत देखील घडला होता. उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतांना कुलस्वामामिनी तुळजाभवानी मंदिरात संभाजीराजे गेले असता, त्यांना देखील गाभाऱ्यात जाण्यापासून रोखण्यात आल्याचा प्रकार घडला होता. यावरून मंदिर प्रशासनावर जोरदार टीका देखील झाली होती. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Tuljapur : तुळजापूरसाठी राज्य सरकारकडून 1385 कोटींचा निधी; कोणती कामे होऊ शकतील?