धाराशिव : बीडमधील सरपंच हत्याकांडप्रकरणी आरोपींवर कडक कारवाईची मागणी करत जिल्ह्याजिल्ह्यात मोर्चे निघत आहे. बीड, परभणी, पुणे, जालन्यानंतर आज वाशिम आणि धाराशिव जिल्ह्यात जनआक्रोश मोर्चा काढला जात आहे. या मोर्चासाठी देशमुख कुटुंबीय धाराशिव जिल्ह्यात आले असून संतोष देशमुख (Santosh deshmukh) यांच्या कन्येनं आज पुन्हा एकदा भावनिक साद घालत आरोपींवर कडक कारवाई व्हावी व न्याय जलद गतीने मिळावा, असे म्हटलं आहे. वैभवी सध्या महाविद्यालयीन शिक्षण घेत असून पुढील महिन्यात बारावीच्या परीक्षा सुरू होणार आहेत. त्यानंतर, दहावी व इतरही परीक्षा सुरु होती. त्याच अनुषंगाने वैभवीने परीक्षांचा दाखला देत, मी माझ्या परीक्षा सुरू होणार असतानाही मोर्चात सहभागी होऊन न्याय मागत असल्याचे वैभवीने म्हटले. दरम्यान, धाराशिवमध्ये (Dharashiv) आजच्या मोर्चाला खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील यांच्यासह अनेक सर्वपक्षीय नेते व लोकप्रितिनीधी उपस्थित राहणार आहेत.
न्याय मागण्यासाठी रस्त्यावरती यावं लागतं ही मोठी दुर्दैवी बाब आहे. देश स्वातंत्र्य झाल्यानंतर देखील न्यायाच्या मागणीसाठी रस्त्यावर यावं लागतं हे दुर्दैवी आहे. माझे गेलेले वडील कोणीही आणू शकत नाही, किमान त्यांच्या मृत्यूनंतर न्याय मिळाला पाहिजे, अशी आमची मागणी आहे. सध्या तपास कुठपर्यंत आला आहे, आणि कोणत्या बाजूने सुरू आहे याबाबत पोलीस प्रशासन कोणतीही माहिती देत नाही. त्यामुळे, पोलिसांनी विनंती आहे की त्यांचा तपास कसा आणि कुठल्या दिशेने सुरू आहे याची माहिती देण्यात यावी, असे आवाहन वैभवी देशमुख हिने केलंय.
माझ्या परीक्षा आहेत, पण मी न्यायासाठी रस्त्यावर
मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं ही लवकरात लवकर सर्व आरोपी अटक होतील आणि न्याय मिळेल. माझ्या परीक्षा आहेत पण मी या परीक्षानंतर देऊ शकते. मात्र, ज्या पद्धतीने माझ्या वडिलांची हत्या झाली आहे, त्यासाठी आता न्याय मागितला नाही तर परत न्याय मिळेल का असा प्रश्न पडतो. परीक्षांपेक्षा माझ्या वडिलांना न्याय मिळाला पाहिजे हीच माझी प्रायोरिटी आहे, असे म्हणत वैभवीने वडिलांच्या न्यायासाठी भावनिक साद घातली. समाजाच्या भावना आहेत, त्यामुळे हे मोर्चे निघत आहेत. लवकर न्याय झाला नाही तर जिल्हा नाही तर तालुका स्तरावर देखील आता मोर्चे निघायला सुरू होतील, असेही वैभवीन म्हटले.
फरार आरोपींना अटक करावी
महाराष्ट्रमध्ये एका माणसाची अशाप्रकारे हत्या होते, हा प्रकार दुर्दैवी, निंदनीय आहे. ज्याला माणुसकी कळते, माणूस धर्म कळतो असा कुठलाच माणूस ही घटना मान्य करणार नाही. भविष्यात असा विचारही कोणाच्या मनात येऊ नये यासाठी आरोपींना कठोर शासन झालं पाहिजे. 2006 साली माझ्या वडिलांची हत्या झाली. मात्र, अजूनही आरोपींना शिक्षा झालेली नाही, ट्रायल सुरू आहे. आज 2024 आहे, तरी अजून केस चालू आहे, पण निकाल लागत नाही, यापेक्षा दुर्दैव काय म्हणावे लागेल. सरकारने तातडीने पावले उचलून जे आरोपी फरार आहेत, त्यांना अटक केली पाहिजे, असे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले.