बीड: बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यात ठिकठिकाणी मोर्चे निघत आहेत, तर दुसरीकडे पोलिस, सीआयडी या घटनेचा तपास करत आहेत. दरम्यान या प्रकरणात होत असलेल्या तपासाची माहिती पोलिस देत नसल्याचा आरोप संंतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या मुलीने केला आहे. संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांची मुलगी वैभवी (Vaibhavi Deshmukh) हिने पोलिसांच्या चौकशीच्या संदर्भात काही सवाल विचारले पोलिसांचा तपास कुठपर्यंत आला या संदर्भामध्ये पोलीस कोणतीच माहिती देत नसल्याचं वैभवीने (Vaibhavi Deshmukh) सांगितलं आहे, वारंवार विचारून देखील माहिती देत नाही असा आरोप वैभवीने (Vaibhavi Deshmukh) केला आहे. त्यावरती धाराशिव आमदार कैलास पाटील यांनी पोलिसांनी या प्रकरणाची माहिती कुटुंबीयांना तरी किमान दिली पाहिजे, या प्रकरणाचा निपक्षपातीपणे तपास व्हायचा असेल तर हे खटला बीड जिल्ह्याच्या बाहेर चालला पाहिजे असं म्हटलं आहे. 


काय म्हणालेत कैलास पाटील?


एबीपी माझाशी बोलताना आमदार कैलास पाटील म्हणाले, देशमुख आणि सूर्यवंशी या दोन्ही कुटुंबांना न्याय मिळायला हवा. यासाठी आजचा जन आक्रोश मोर्चा काढत असल्याची प्रतिक्रिया पाटील यांनी दिली आहे. वैभवी देशमुख स्वतः म्हणत असेल आम्हाला पोलीसांच्याकडून माहिती मिळत नाही, तर ही बाब बरोबर नाही, असेही कैलास पाटील यांनी म्हटलं आहे.


आज धाराशिव जिल्ह्यातला प्रत्येक नागरिक खूप मोठ्या संख्येने मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. हा जनआक्रोश मोर्चा हा कोणत्या जातीच्या किंवा समाजाच्या विरोधात नाही. तर जी प्रवृत्ती आहे त्या विरोधात न्याय मिळवण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येत आहे. फक्त देशमुख कुटुंबीयांना आणि सूर्यवंशी कुटुंबीयांना न्याय मिळावा अशी या मोर्चा भूमिका आहे. देशमुख कुटुंबियांचे मागणी आहे, जी सर्वसामान्य माणसाची मागणी आहे, तीच आमची मागणी आहे. पोलिसांचा अपयश आत्तापर्यंत या प्रकरणात नाव समोर आलं नाही किंवा त्या तपासात काय घडतंय, हे अद्याप पर्यंत जर समोर येत नसेल तर ते गृहमंत्रालयाचे पर्यायाने मुख्यमंत्र्यांचे अपयश आहे, असं मला वाटतं असंही पुढे कैलास पाटील यांनी म्हटलं आहे. 


वैभवी देशमुखचा व्हिडिओ वरती बोलताना कैलास पाटील म्हणाले, किमान त्या कुटुंबीयांना तरी या प्रकरणातील तपासात काय चाललंय याची माहिती देणे आवश्यक आहे. पोलीस का माहिती देत नाहीत, यामागे ते कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत का? परत दुसरं काही निष्पन्न करायचा आहे का? किंवा त्यांना कोणत्या आरोपीला वाचवायचा आहे का? असे अनेक निष्कर्ष समोर येतात. संतोष देशमुख यांच्या मुलीने जर हा आक्षेप घेतला असेल तर त्यावर निश्चित गृहमंत्रालयाने आणि मुख्यमंत्र्यांनी विचार करावा आणि निष्पक्षपणे या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. सर्वात महत्त्वाचं बीडमध्ये सध्या जे सुरू आहे,  त्यामध्ये काही तपास अधिकारी हे आरोपीची संबंधित होते. त्यांना काढलं गेलं, मात्र माझी अशी मागणी आहे. आपण सुरुवातीपासूनच ज्या आरोपीचा त्या अधिकाऱ्यांशी कधीच कसलाही संबंध आलेला नाही, अशा अधिकाऱ्यांना त्या तपास यंत्रणात सामावून घेतलं जावे आणि निष्पक्षपणे हा तपास होणे आवश्यक वाटत असेल तर हा या प्रकरणाचा तपास बीड जिल्ह्याबाहेरून चालला पाहिजे, असंही मला वाटतं असं आमदार कैलास पाटील यांनी पुढे म्हटलं आहे.