धाराशिव : जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, गरोदर महिलेला कुत्रा (Dog) चावल्यावर रुग्णालयात उपचारासाठी आल्यावर तिला चक्क गर्भपाताचे इंजेक्शन देण्यात आले आहेत. त्यामुळे आता महिलेच्या पोटातील चार महिन्यांच्या गर्भाला धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या धाराशिव जिल्ह्यात घडल्याने खळबळ उडाली आहे. 


अधिक माहितीनुसार धाराशिव जिल्ह्यातील अवधूतवाडी येथील एका गरोदर महिलेला कुत्रा चावलेला असल्याने त्या दहिफळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मंगळवारी रेबिजची लस घेण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी डॉक्टर उपस्थित नसल्यामुळे तेथील कम्पाऊंडरने डॉक्टरला फोन लावून कोणते इंजेक्शन देऊ, अशी विचारणा केली. त्यावेळी डॉक्टरांनी सांगितलेले इंजेक्शन कम्पाऊंडरने दिले. मात्र, रुग्णास इंजेक्शन देताच अवघ्या 20 मिनिटांत मळमळ, उलटी, चक्कर, अशक्तपणा व रक्तस्त्राव होऊ लागल्यामुळे तत्काळ त्यांना धाराशिव येथील स्त्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे देण्यात आलेले इंजेक्शन दाखवल्यानंतर हे इंजेक्शन कुत्रा चावल्यावर देण्याचे नसून ते गर्भपात होण्याचे आहे व त्यामुळेच हा त्रास सुरू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे महिलेस व नातेवाईकांना मोठा धक्का बसला, असल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. 


दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवा समाप्त 


या सर्व घटनेनंतर पिडीत महिलेच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे त्यांनी थेट पोलिसांत धाव घेतली आहे. ज्यात, "फोनवरून उपचार करणारे डॉक्टर व प्रत्यक्ष इंजेक्शन देणाऱ्या कम्पाऊंडरसह कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा," अशी तक्रार येरमाळा पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलिसांत अर्ज दाखल झाल्याची माहिती मिळताच आरोग्य विभाग देखील खडबडून जागे झाले आहेत. धाराशिव जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत, तातडीने माहिती मागवून घेतली. तसेच, वैद्यकीय अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणामुळे हा सर्व प्रकार घडल्याने तत्काळ दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवा समाप्त केल्या आहेत, तर एका नियमित वैद्यकीय अधिकाऱ्याच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आली आहे. 


आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील घटना...


शासकीय रुग्णालयात मिळणाऱ्या सेवांबद्दल अनेकदा तक्रारी येत असतात. मात्र, धाराशिवमध्ये तर चक्क कुत्रा चावलेल्या गरोदर महिलेला गर्भपाताचे इंजेक्शन देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे ही घटना आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या धाराशिव जिल्ह्यात घडली आहे. त्यामुळे आता या सर्व प्रकरणावरून तानाजी सावंत यांच्याकडून आणखी कोणती कारवाई केली जाते का?, हे पाहणे महत्वाचे असणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


वडील प्रेयसीसोबत, तर आई प्रियकरासोबत पळून गेली; तीन मुली वाऱ्यावर, शेजाऱ्यांकडून देखभाल