Dharashiv News: धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर (Tuljapur) तालुक्यात पवनचक्की (Windmill) कंपनी आणि शेतकरी (Farmer) यांच्यातील वादातून एका 25 वर्षीय तरुणाचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. मोबदला न मिळाल्याने शेतातून गेलेल्या पवनचक्कीच्या वीजतारा कापण्यासाठी गेलेल्या तरुणाचा हा अपघाती मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Continues below advertisement

तुळजापूर तालुक्यातील देवसिंगा (तुळ) येथे रिन्यू पवनचक्की कंपनीच्या वीजतारांमध्ये विद्युत प्रवाह सुरू असल्याची पूर्ण माहिती असतानाही तरुणास पोलवर चढवण्यात आल्याचा आरोप मृत तरुणाच्या नातेवाईकांनी केला आहे. या घटनेत दत्ता हब्बास वाघमारे (वय 25) या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी विद्याधर तानाजी जाधव व जितेंद्र गुलाब मस्के (दोघे रा. देवसिंगा तुळ, ता. तुळजापूर) हे दोघे जबाबदार असल्याचा आरोप मृत तरुणाच्या बहिणीने केला असून, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

दत्ता वाघमारे हा मजुरी, मिस्त्री व बांधकामाच्या ठिकाणी काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. याप्रकरणी मृताची बहीण निकिता अक्षय मस्के हिने तुळजापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, विद्याधर तानाजी जाधव हा दत्ताच्या घरी आला होते. त्याने आपल्या शेतातून रिन्यू पवनचक्की कंपनीच्या वीजतारा गेलेल्या असून, कंपनीकडून अद्याप मोबदला मिळाला नसल्याने त्या तारा कापण्याचे काम असल्याचे त्यांनी सांगितले.

Continues below advertisement

Dharashiv News: तारांमध्ये करंट नाही, कंपनीची परवानगी घेतल्याची बतावणी  

दत्ता हा इलेक्ट्रीशियन नसून त्याला अशा प्रकारच्या कामाचा कोणताही अनुभव नव्हता. त्यामुळे त्याने सुरुवातीला जाण्यास नकार दिला होता. मात्र, “तारांमध्ये करंट नाही, कंपनीची परवानगी घेतलेली आहे,” असे खोटे सांगून आणि हजेरीपोटी पाचशे रुपये देण्याचे आमिष दाखवून त्याला सोबत नेण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

Dharashiv News: उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू

यानंतर ग्रामपंचायतीची शिडी लावून रिन्यू पवनचक्की कंपनीच्या पोलवर दत्ता यास चढविण्यात आले. पोलवर चढताच वीजतारांमधील तीव्र विद्युत प्रवाहाचा जोरदार धक्का बसून दत्ता खाली कोसळला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला प्रथम तुळजापूर येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी धाराशिव येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

Dharashiv News: पोलिसांकडून तपास सुरु

या घटनेनंतर मृत तरुणाच्या कुटुंबीयांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, संबंधित शेतकऱ्यांनी जाणीवपूर्वक तरुणाचा जीव धोक्यात घातल्याचा आरोप केला आहे. नातेवाईकांच्या तक्रारीनुसार तुळजापूर पोलिसांनी विदयाधर जाधव व जितेंद्र मस्के यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Samruddhi highway accident: समृद्धी महामार्गावर कारचा टायर फुटला, कल्याणमधील कुटुंबावर काळाचा घाला, अपघातापूर्वीचा व्हिडीओ व्हायरल