Dharashiv Water Issues: मे महिन्यात उन्हाचा चटका अधिक जाणवत होता. त्यामुळे बाष्पीभवनामुळे प्रकल्पातील पाणीसाठा घटू लागला आहे. दरम्यान धाराशिव (Dharashi) जिल्ह्यात देखील अशीच काही परिस्थिती पाहायला मिळत आहे. तर जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यातील 226 प्रकल्पांपैकी 16 प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. तसेच उर्वरित प्रकल्पांमध्ये केवळ 92.8099 दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. त्याची टक्केवारी 12.75 इतकी आहे. त्यामुळे पाणीटंचाईची चाहूल जाणवू लागली आहे.
धाराशिव जिल्ह्यात एक मोठा प्रकल्प असून, 17 मध्यम व 208 लघु असे एकूण 226 प्रकल्प आहेत. या एकूण प्रकल्पांची पाणीसाठवण क्षमता 726.9833 दलघमी इतकी आहे. विशेष म्हणजे याच लहान-मोठ्या प्रकल्पातून शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना पाणीपुरवठा होतो. सोबतच शेतीसाठीही या प्रकल्पातील पाणी शेतकऱ्यांना मिळते. मात्र मार्च ते मे महिन्यात कडक ऊन पाहायला मिळाले. तर जून महिन्यात देखील सूर्य आग ओकत आहे. त्यामुळे बाष्पीभवनही वाढले आणि प्रकल्पातील पाणीसाठ्यात घट होत आहे. ज्यामुळे एकूण 226 प्रकल्पातील 16 प्रकल्प जूनपर्यंत कोरडे पडले आहेत. उर्वरित प्रकल्पांमध्ये 92.8099 दलघमी म्हणजेच 12.75 टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. मान्सून लांबणीवर पडल्यास येत्या महिन्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना अनेक गावांना भासू शकतो. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.
अधिग्रहणासाठी प्रस्ताव
उन्हाचा पारा वाढला असून, त्यामुळे बाष्पीभवन देखील वाढले आहे. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील बहुतांश गावांना जून महिन्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. तर आतापर्यंत 76 गावांनी अधिग्रहणासाठी प्रस्ताव पाठवले आहेत. यातील काही प्रस्तावांना मंजुरीही मिळाली आहे. मात्र, मान्सून दाखल होण्यास विलंब झाल्यास तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे अशा परिस्थितीत गावकऱ्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ येऊ शकते. पाणीपुरवठा विभागाच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार सध्यातरी धाराशिव जिल्ह्यात एकही पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरु नाहीत.
जिल्ह्यातील प्रकल्पाची परिस्थिती
- जिल्ह्यातील 226 प्रकल्पांपैकी 16 प्रकल्प आटले आहेत.
- ज्यात 85 प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याच्या खाली आहे.
- तर 99 प्रकल्पांमध्ये 25 टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे.
- तसेच 23 प्रकल्पांमध्ये 26 ते 50 टक्के पाणीसाठा आहे.
- तर, केवळ 3 प्रकल्पांमध्ये 51 ते 75 टक्के पाणीसाठा आहे.
पाणी जपून वापरा...
यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असणार असल्याचा अंदाज काही अभ्यासकांनी वर्तवला आहे. दरम्यान अशात जिल्ह्यातील प्रकल्पातील पाणीसाठा कमी होत आहे. तर काही प्रकल्प कोरडेठाक पडली आहे. त्यातच 7 जून उलटून देखील जिल्ह्यात अजूनही पावसाने हजेरी लावलेली नाही. तर आगामी काही दिवसांत पाणी टंचाई निर्माण होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचे वापर जपून केला पाहिजे.
इतर महत्वाच्या बातम्या: