Gajanan Maharaj Palkhi : श्री क्षेत्र शेगावहून आषाढी वारीसाठी (Ashadhi Wari) पंढरपूरकडे निघालेल्या श्री संत गजानन महाराजांच्या दिंडीचे शुक्रवारी कळंबमार्गे धाराशिव जिल्ह्यात आगमन झाले आहे. या दिंडीचे कळंबकरांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले.  शुक्रवारी बीड जिल्ह्यातील गोटेगावमार्गे धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथे या दिंडीचे आगमन झाले. यावेळी शहराच्यावतीने नगरपरिषदेचे कार्यालयीन अधीक्षक दीपक हारकर, स्वच्छता निरीक्षक संजय हाजगुडे, गोविंद रणदिवे आदींनी संत श्री गजानन महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून स्वागत केले. शहरात दिंडीचे आगमन होताच फटाक्याच्या आतषबाजीने व संत श्री गजानन महाराज की जय', 'गण गण गणात बोते या जयघोषाने शहर दणाणून गेले होते. विशेष म्हणजे पाच जिल्हे आणि जवळपास साडेसातशे किलोमीटरचा टप्पा पार करुन तब्बल एक महिन्यांची मजल दरमजल करत पंढरीच्या विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी शेगावहून संत गजानन महाराजांची पालखी (Gajanan Maharaj Palkhi) दिंडीसह आषाढी एकादशीच्या आधी पोहोचते.


संत गजानन महाराजांची पालखी जिल्ह्यात दाखल होताच कळंब शहरातील प्रमुख चौकात मुख्य रस्त्यावर, बाजारपेठेत नागरिकांनी पालखीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. वारकऱ्यांसाठी भोजन, अल्पोपहार, चहा, पाणी, वैद्यकीय तपासणी, औषधे, दैनंदिन गरजेच्या वस्तू आदींची व्यवस्था विविध संस्था तसेच नागरिकही वैयक्तिक स्तरावर केली होती. दिंडीचा मुक्काम असलेल्या न. प. शाळेतही रात्री उशिरापर्यंत कळंब शहर व परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. अनेक धार्मिक कार्यक्रमांचेही यावेळी आयोजन करण्यात आले होते.


तीन दिवस दिंडी जिल्ह्यातच राहणार 


धाराशिव जिल्ह्यात दाखल झालेली संत गजानन महाराजांची पालखी कळंब येथून 17 जूनला गोविंदपूरमार्गे दिडी ढोकी कारखाना येथे मुक्कामी असणार आहे. 18 जूनला किणीमार्गे उपळा येथे मुक्कामी, 19 रोजी धाराशिव शहरात मुक्कामी. 20 रोजी वडगावमार्गे तुळजापूर येथे मुक्कामी राहून 21 जून रोजी सांगवीमार्गे सोलापूर जिल्ह्यातील उळे येथे प्रस्थान करणार आहे.


पालखीचा 750 किलोमीटरचा प्रवास 


गजानन महाराज पालखीसोबत सातशे वारकरी, तीन अश्व, नऊ गाड्या आणि रुग्णवाहिका आहे.
पालखी 27 जूनला पंढरपूरला पोहोचणार असून, दिंडी नऊ जिल्ह्यातून मार्गक्रमण करीत आहेत.
शेगाव ते पंढरपूर पायी वारी 33 दिवसांची असून, वारकऱ्यांचा 750 किलोमीटरचा प्रवास होणार आहे. 


असा असणार परतीचा प्रवास... 


श्री संत गजानन महाराजांची पालखी 27 जून रोजी पंढरपूरमध्ये पोहोचणार आहे. याठिकाणी श्री गजानन महाराज संस्थानच्या शाखेत पालखीचा पाच दिवस मुक्काम असणार आहे. दरम्यान 3 जुलै रोजी श्री संत गजानन महाराजांची पालखी परतीच्या मार्गावर निघणार आहे. ज्यात एकूण 22  मुक्काम असणार आहे. दरम्यान 24 जुलै रोजी श्रींची पालखी शेगावला परत पोहोचणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Ashadhi Wari 2023: गजानन महाराजांच्या पालखीचे अंबाजोगाईत जल्लोषात स्वागत; आजचा मुक्काम केज तालुक्यात