धाराशिव : बारामतीमध्ये फक्त लोकसभेच्या जागेसाठीच नव्हे तर प्रचारसभेच्या जागेवरून देखील दोन पवारांमध्ये खडाजंगी पाहायला मिळत आहे. प्रत्येक निवडणुकीत बारामतीतील प्रचाराची सांगता शरद पवारांच्या (Sharad Pawar) सभेनं होत असते. आधी स्वतःसाठी आणि पुढे लेक सुप्रिया सुळेंसाठी (Supriya Sule)शरद पवार सभा घेत आलेले आहेत. मात्र आता शरद पवारांना नव्या जागेचा शोध घ्यावा लागणार आहे.
ख्रिश्चन कॉलनीतील कॅनॉल लगत असलेल्या मैदानावर ही सभा होत असते. शरद पवारांचा हा शिरस्ता किंवा परंपरा म्हणता येईल. असं असताना यावेळच्या निवडणुकीत शरद पवारांना या सभेसाठी नवीन जागा शोधावी लागणार आहे. कारण ख्रिश्चन कॉलनीतील मैदान अजित पवारांनी आधीच बुक करून ठेवलंय. त्यामुळे या मैदानावर सुनेत्रा पवारांच्या प्रचाराची सांगता होणार हे स्पष्ट आहे. महत्त्वाचं म्हणजे अजित पवार हेच समारोपाचं भाषण करणार हेदेखील स्पष्ट आहे.
अशा सगळ्या परिस्थितीत शरद पवारांना समारोप सभेसाठी बारामतीमध्ये दुसरी कुठलीतरी जागा शोधावी आणि मिळवावी लागणार आहे. 7 मे ला बारामती लोकसभेसाठी मतदान आहे. 5 मे रोजी या ठिकाणचा प्रचार संपेल. दुपारी 4 च्या दरम्यान समारोपाच्या सभा होतील. अजित पवारांची सभा कुठे होणार हे तर निश्चित झालंय. पण शरद पवारांची तुतारी कुठे वाजणार?त्याबद्दल उत्सुकता आहे.
त्याचवेळी सुनेत्रा पवारांना निवडून आणण्यासाठी म्हणजेच बारामतीवर पुरता कब्जा मिळवण्यासाठी अजित पवारांची यंत्रणा कशा पद्धतीने काम करतेय, हेदेखील या निमित्तानं अधोरेखित झालंय. अजित पवारांनी सभेसाठी जागा तर काबीज केली आहे. मात्र सुनेत्रा पवारांना निवडून आणत अजित पवार बारामती काबिज करणार का?, पाहणं महत्वाचं असणार आहे.
सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा पवारांकडून घेतलेल्या कर्जावर अजित पवार काय म्हणाले?
धाराशिवमध्ये बोलताना अजित पवारांनी सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा पवारांकडून घेतलेल्या कर्जावर भाष्य केलं आहे. सुप्रिया सुळे यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात अजित पवार आणि सुनेत्रा पवारांकडून घेतलेल्या कर्जाच्या प्रश्नावरून अजित पवार पत्रकारांवर चिडले आहे. शपथपत्रात सगळं खरं लिहिलं जात त्यात आम्ही कर्ज दिल्याने कोणाला काही त्रास होत आहे का?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. कर्जासंदर्भात जाब विचारायचा अधिकार कोणालाही नाही, असं म्हणत त्यांनी पत्रकारांना चांगलंच फटकारलं.
इतर महत्वाची बातमी-