मुंबई : राज्यात अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात झालेल्या नुकसानीसाठी भरपाई म्हणून 10 हजार कोटी रुपये राज्य सरकारने जाहीर केले आहेत. यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपला शब्द फिरवत आज जाहीर केलेले पॅकेज हे अतिशय फसवे असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आजच्या पॅकेजवर फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.


बळीराजाला अतिशय तोकडी मदत देताना, त्यांनी निव्वळ बहाणे शोधले. शेतकर्‍यांचे झालेले प्रचंड नुकसान पाहता त्यांनी जाहीर केलेली मदत ही तोंडाला पाने पुसणारी आहे. यापूर्वी ₹25,000 आणि 50,000 रूपये हेक्टरी मदतीची मागणी त्यांनीच केली होती. फळबागांसाठी तर एक लाखांपर्यंत मदत त्यांनी मागितली होती. पण, आता ती मदत द्यायची नाही, म्हणून केंद्र सरकारवर जबाबदारी ढकलण्याचा केविलवाणा प्रयत्न ते करीत आहेत.


अतिवृष्टीग्रस्तांसाठी 10 हजार कोटींची मदत, मुख्यमंत्र्यांची घोषणा


नियमित अर्थसंकल्पातील आकड्यांनाच पॅकेज भासवून मलमपट्टी केल्याचा आव सरकार आणू पाहत आहे. पण, केवळ देखावा निर्माण करून शेतकर्‍यांना अजिबात मदत मिळणार नाही. बहाणेबाजी करून महाविकास आघाडी सरकारने शेतकर्‍यांची घोर निराशा केली, फसवणूक केली. किमान शेतकर्‍यांच्या बाबतीत तरी आणि झालेल्या नुकसानीची तीव्रता पाहता अशा काल्पनिक आकड्यांची धूळफेक मुख्यमंत्री करतील, असे वाटले नव्हते. हा शेतकर्‍यांसोबत झालेला मोठा विश्वासघात आहे. निसर्गाने तर अन्याय केलाच, आता सरकारही सूड घेत आहे.


सरकारने तुटपुंजी मदत जाहीर केली : चंद्रकांत पाटील


कधी नव्हे ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बाहेर पडले होते, भरीव मदत मिळेल असं वाटलं होतं. पण सरकारने तुटपुंजी मदत जाहीर केली आहे. सरकारच्या अपुऱ्या मदतीने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली म्हणत राज्य सरकारवर चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे. केंद्राकडून जीएसटी भरपाई किती रक्कम मिळणार आहे हे आधी ठरवा, महाविकास आघाडीत एकवाक्यता नाही, कुणी म्हणतंय 38 हजार कोटी, कुणी 60 हजार कोटी. पण जीएसटी भरपाई, शेतकरी मदत ही तुलना बरोबर नाही, अशी टीकाही त्यांनी केली.


सरकारच्या दहा हजार कोटी रुपयांमध्ये शेती, घरांसाठी, रस्ते-पुलाचं बांधकाम, पाणी पुरवठा याचा समावेश आहे.


रस्ते- पूल - 2635 कोटी
नगर विकास - 300 कोटी
महावितरण ऊर्जा - 239 कोटी
जलसंपदा - 102 कोटी
ग्रामीण रस्ते व पाणीपुरवठा - 1000 कोटी
कृषी-शेती-घरासाठी - 5500 कोटी


Relief Package for Rain-Hit Areas | अतिवृष्टीग्रस्तांसाठी सरकारकडून 10 हजार कोटींची मदत जाहीर