नागपूरः तत्कालीन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीनंतर कार्यालयात विलंबाने पोहोचणाऱ्यांची संख्या वाढली आहे. यात एका दिवसातच तब्बल सातशे लोकांना उपायुक्त निर्भय जैन यांनी रंगेहात पकडले. दहा वाजताची कार्यालयीन वेळ असताना अनेक कर्मचारी आणि अधिकारी 11.30 -12.30 वाजता कार्यालयात पोहोचले. विलंबाने येणाऱ्या सर्वांवर करावाई करण्याचे निर्देश मनपा उपायुक्त निर्भय जैन यांनी विभाग प्रमुखांना दिले. मात्र या घटनेने महानगरपालिकेतील कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या कामाबाबतचा बेजबाबदारपणा उघड झाला आहे.
नागपूर महानगरपालिकेत कर्मचाऱ्यांची येण्याची वेळ सकाळी 10 वाजताच निश्चित आहे. मात्र अनेक कर्मचारी साडेअकरा-बारा वाजेपर्यंत कार्यालयात येतात. विशेष म्हणजे या लेटलतिफ कर्मचाऱ्यांवर विभागप्रमुखांचेही नियंत्रण नसल्याचे पुढे आले आहे. काही विभागप्रमुखही विलंबाने कार्यालयात पोहोचतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर परिणाम झाल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे आज महानगरपालिका उपायुक्त निर्भय जैन यांनी 10 वाजेनंतर प्रशासकीय इमारतीतील सर्वच विभागात धाड घातली. यावेळी निम्मे कार्यालय रिक्त असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ विभागातील हजेरी नोंदणी रजिस्टर ताब्यात घेतले.
प्रवेशद्वारावरच भरला 'लेटलतिफां'चा वर्ग
इमारतीच्या प्रवेशदाराजवळच विलंबाने येणाऱ्या कर्मचाऱ्यांची उलटतपासणी सुरू केली. अनेक कर्मचाऱ्यांनी चुकीची कारणे दिली. एका कर्मचाऱ्याने बाहेर फिल्डवर होतो, त्यामुळे विलंब झाल्याचे सांगितले. यावेळी उपायुक्तांनी नेमके कुठे होता, असे विचारले असता जलकुंभावर होतो, असे सांगितले. कुठल्या जलकुंभावर होते, अशी विचारणा केल्यानंतर कर्मचाऱ्याला पाच मिनिटे लागली सांगायला. असे अनेक कर्मचारी प्रवेशद्वाराजवळ दिसून आले. अखेर उपायुक्त निर्भय जैन यांनी त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश विभागप्रमुखांना दिले.
वेळेवर येताच चहाटपरीवर
महानगरपालिकेत अनेकजण वेळेवर येतात. मात्र नंतर लगेच चहा घेऊन येऊ म्हणत, चहाटपरी गाठतात. जणू हजेरी पुस्तक चहा टपरीवरच ठेवले आहे. अनेक कर्मचारी कामाची सुरुवातही न करता कार्यालयाबाहेर निघत असल्याचे काही वेळेवर येणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. अनेकांचा दिवसभर असाच क्रम सुरु असतो. अशा कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्याची गरज प्रामाणिक कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
झोनमधील 'खास' कर्मचारी सहायक आयुक्तांच्याही नियंत्रणाबाहेर
मनपाच्या झोन कार्यालयातही असाच प्रकार सुरु असून अधिकारी आणि कर्मचारी कधी भेटत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली. नागरिकांना दैनंदिन कामासाठीही चकरा माराव्या लागतात. काही कर्मचारी तर कायमच फिल्डवर असल्याचा कांगावा करतात. ही बेशिस्त मंडळी स्थानिक नेत्यांची 'खास' असल्याने यावर झोनच्या उपायुक्तांचेही नियंत्रण नसल्याचे दिसून आले आहे.
नागरिकांची असुविधा खपवून घेतली जाणार नाहीः निर्भय जैन
उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे नागरिकांची असुविधा होत असते. नागरिकांची कामे वेळेत पूर्ण व्हावी यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. मनपा मुख्यालयाप्रमाणेच आता झोन कार्यालयातही धडक दिली जाईल. उशीरा येणाऱ्या सर्वांची चौकशी करुन कारवाई करण्याचे निर्देश विभागप्रमुखांना देण्यात आले आहे. यातील किती लोक फिल्डवर होते व किती घरी, हे स्पष्ट होईलच. तसेच लेटलतिफांना याची किंमत मोजावी लागणार आहे, असा इशारा मनपा उपायुक्त निर्भय जैन यांनी दिला आहे.