मुंबई: मुख्यमंत्र्यांच्या घरावर बॉम्ब फेकण्याचं वक्तव्य करणारे आमदार बच्चू कडू यांना दहशतवादी घोषित करा, अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली आहे.


सरकारनं आमच्या मागण्या मान्य केला नाहीत तर भगत सिंहांनी ज्या पद्धतीनं संसदेवर बॉम्ब हल्ला केला होता. तसा मुख्यमंत्र्यांच्या घरावर बॉम्ब फेकू असं आमदार बच्चू कडू म्हणाले होते. ते काल एबीपी माझाच्या शेतकरी परिषदेत बोलत होते.

बच्चू कडू यांच्या या वक्तव्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी थेट बच्चू कडू यांना दहशतवादीच घोषित करण्याची मागणी केली आहे.

इतकंच नाही तर अमरावतीत थोड्याचवेळात भाजपचे कार्यकर्ते आंदोलन करणार असून बच्चू कडूंना अटक करण्याची मागणीही करण्यात येत आहे.

बच्चू कडू यांचं स्पष्टीकरण

दरम्यान, याबाबत स्पष्टीकरण देताना बच्चू कडू म्हणाले, "बॉम्ब फेकणार याचा अर्थ खरोखर बॉम्ब फेकणार असं नाही. हा शेतकऱ्यांबाबतचा आक्रोश आहे. बॉम्ब फेकलाच तर त्याने कोणालाही इजा होणार नाही, तो फक्त आवाज करणारा सुतळी बॉम्ब असेल".

शेतकऱ्यांसाठी आतंकवादी घोषित करू देत, पण बॉम्ब टाकताना मुख्यमंत्र्यांच्या शर्टलाही धक्का लागणार नाही हा आवाजापुरता असेल, असं बच्चू कडू म्हणाले.

याशिवाय सध्याचं चित्र काँग्रेस सरकारप्रमाणंच आहे. काँग्रेसच्या काळात शेतकऱ्यांना गोळ्या घातल्या जात होत्या, भाजपाही तेच करतंय, असंही बच्चू कडू म्हणाले.

ही लढाई देश पातळीवर न्यायची आहे. मोदी ज्या भागातून आहेत त्या गुजरातेत शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. आंदोलनात शेतकरी नाही असं म्हणणं हे मुख्यमंत्रांचं नाही तर सरपंचाचं वक्तव्य वाटतं, असा टोलाही त्यांनी लगावला.