मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) 2019 चे वार्षिक पुरस्कार जाहीर केले आहेत. एकदिवसीय संघाचा उपकर्णधार आणि सलामीवीर रोहित शर्माला 'आयसीसी वनडे क्रिकेटर ऑफ द इयर' या पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. तर कर्णधार विराट कोहलीला 'आयसीसी स्पिरीट ऑफ क्रिकेटर' पुरस्कार घोषित झाला आहे. जलदगती गोलंदाज दीपक चहरला टी-20 सामन्यातील उत्कृष्ट कामगिरीसाठीचा 'टी-20 परफॉर्मन्स ऑफ द इयर' हा पुरस्कार जाहीर झाला आहे.


या पुरस्कारांसोबतच आयसीसीच्या एकदिवसीय आणि कसोटी संघांमध्येदेखील भारतीय खेळाडूंचा वरचष्मा पाहायला मिळाला आहे. आयसीसीच्या 2019 च्या एकदिवसीय संघात चार भारतीय खेळाडूंचा समावेश आहे सलामीवीर रोहित शर्मा, विराट कोहली, मोहम्मद शमी आणि कुलदीप यादवचा यात समावेश करण्यात आला आहे. तर आयसीसीच्या कसोटी संघात मयांक अग्रवाल आणि विराट कोहलीचा समावेश करण्यात आला आहे. आयसीसीच्या दोन्ही संघांचं नेतृत्व विराटकडे सोपवण्यात आलं आहे.


2019 हे वर्ष भारताचा सलामीवीर रोहित शर्मानं गाजवलं आहे. या वर्षात त्याने धावांत रतीब घातला होता. रोहितने या वर्षात वर्ल्ड कप स्पर्धेतील 5 शतकांसह एकूण 7 शतकी खेळी केल्या. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 28 सामन्यांत 57.30 च्या सरासरीने तब्बल 1 हजार 490 धावा चोपल्या होत्या. त्यामुळेच त्याला 'आयसीसी वन डे क्रिकेटर ऑफ द इयर' पुरस्कार घोषित झाला आहे.





जलदगती गोलंदाज दीपक चहरनं 2019 मध्ये टी-20 क्रिकेटमधील सर्वोत्तम कामगिरी करण्याचा पुरस्कार पटकावला आहे. त्याने बांगलादेशविरुद्धच्या टी-20 सामन्यात हॅटट्रिकसह अवघ्या 7 धावांत 6 बळी मिळवले होते. टी-20 क्रिकेटमध्ये हॅटट्रिक मिळवणारा दीपक पहिला गोलंदाज ठरला आहे.





टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेदरम्यान (भारत वि. इंग्लंड सामन्यात) स्टीव्ह स्मिथवर टीका करणाऱ्या प्रेक्षकांना सज्जड दम भरला होता. त्यासोबतच त्याने स्मिथला प्रोत्साहन देण्याचे काम केले होते. तसेच प्रेक्षकांनादेखील तसे करण्याचे आवाहन करुन लोकांची मनं जिंकली होती. विराटच्या या कृतीला सर्वाधिक पसंती मिळाली होती. आयसीसीने या कृतीला स्पिरीट ऑफ क्रिकेट या पुरस्काराने गौरवले आहे.








दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लाबुशेन याने 2019 च्या सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडूचा पुरस्कार पटकावला आहे. लाबुशेन याने 2019 मध्ये कसोटीत पदार्पण केले. त्याने 11 कसोटी सामन्यांत 64.94 च्या सरासरीने 1 हजार 104 धावा केल्या.