मुंबई : 'दंगल गर्ल' अशी ओळख असलेली युवा अभिनेत्री झायरा वसिमने बॉलिवूडला अलविदा करण्याचा निर्णय धर्माशी जोडल्यानंतर विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. अभिनेत्री रवीना टंडनने झायराच्या निर्णयावर संताप व्यक्त केला आहे. अभिनेत्री नगमाने तिला पाठिंबा दिला आहे, तर केआरकेने हा झायराचा प्रसिद्धीचा फार्स असल्याची टीका केली आहे.


रवीना टंडनने झायराच्या कृतघ्नपणावर बोट ठेवलं आहे. 'ज्या इंडस्ट्रीने तिला भरभरुन दिलं, त्या अवघ्या दोन चित्रपटात झळकलेल्या व्यक्तीने कृतज्ञता न बाळगल्याने फारसा फरक पडत नाही. फक्त तिने आपली प्रतिगामी मतं स्वतःजवळ ठेवावीत आणि मानाने बाहेरचा रस्ता धरावा' असं परखड मत रवीनाने ट्विटरवरुन व्यक्त केलं आहे.


एखाद्या 16-17 वर्षांच्या मुलीने असा निर्णय घेणं, ही दुर्दैवी गोष्ट असल्याचं मत ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी व्यक्त केलं. हा तिचा वैयक्तिक निर्णय आहे. मी तिच्या मताचा, भावनांचा आदर करतो. एकीकडे आपण महिला सबलीकरणाच्या गप्पा मारत असल्यामुळे, एक व्यक्ती म्हणून मला तिच्या निर्णयाबाबत खंत वाटते. आपल्या देशाने प्रत्येकाला आपापला निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे. मात्र तिने धर्मामुळे हा निर्णय घेतल्याचं म्हटल्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळाल्याचं खेर म्हणाले.

दुसरीकडे, अभिनेता कमाल आर खानने हा झायराचा पब्लिसिटी स्टंट असल्याची टीका केली आहे. 'झायरावर विश्वास ठेवू नका. ती फक्त प्रसिद्धीच्या हव्यासातून करत आहे. तिच्याइतकी नाटकी मुलगी मी पाहिलेली नाही. ती बॉलिवूडमध्ये आहे आणि कधीही सोडून जाणार नाही. काळजी करु नका, आमिर खान तिच्यासाठी आणखी चित्रपटांची निर्मिती करेल.' असं केआरके ट्विटरवरुन म्हणतो.


अभिनेत्री नगमाने मात्र झायरा साहसी मुलगी असल्याचं म्हटलं आहे. आपण कठीण काळात तिच्या पाठिशी उभं राहायला हवं, असं आवाहन तिने केलं आहे. 'आमचा तुला पाठिंबा आहे. आम्हाला तुझं काम आवडतं.' असंही नगमा म्हणाली.


झायराने रविवारी (30 जून) इन्स्टाग्रामवर सहा पानांच्या मोठ्या पत्रात सिनेसृष्टी सोडण्याच्या निर्णयाची माहिती दिली होती. या क्षेत्रातील झगमगाट आणि यश मला ईश्वर आणि इमानापासून सातत्याने दूर नेत आहे, असं झायराने म्हटलं आहे.
  दंगल सिनेमासाठी झायराला 2016 साली राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. पैलवान गीता फोगटच्या बालपणाची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या झायराला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

त्यानंतर 2017 मध्ये झायरा 'सिक्रेट सुपरस्टार' सिनेमातून पुन्हा आमिर खानसोबत रुपेरी पडद्यावर झळकली होती. या सिनेमासाठी झायराला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा समीक्षक पुरस्कार मिळाला होता.

तुझ्या करिअरचा निर्णय धर्माशी जोडू नकोस. तुझं हे पाऊल तुझ्या धर्माला असहिष्णू ठरवतं. इस्लाममध्ये सहिष्णुतेला जागा नाही, या चुकीच्या धारणेला हा निर्णय बळ देतो, अशा शब्दात शिवसेना नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी झायराला उत्तर दिलं.

भाजपनेही झायरा वसीमच्या निर्णयावर टीका केली आहे. 'धर्माच्या आधारावर अभिनय सोडण्याचा निर्णय दबावात घेतल्याचं दिसत आहे. ती सातत्याने कट्टरवादी संघटनांच्या निशाण्यावरही होती' असं भाजपचे प्रवक्ते शाहनवाज हुसेन म्हणाले

दुसरीकडे नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला यांनी झायराच्या निर्णयाचा आदर करण्याचं आवाहन केलं आहे. झायरा वसिमचा हा निर्णय इस्लाम धर्माचं पालन करणाऱ्यांसाठी योग्य आहे, असं म्हणत समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी तिच्या निर्णयाचं स्वागत केलं. इस्लाम धर्मात नाच-गाणं चालत नाही, असंही ते म्हणाले.