Cryptocurrency Fraud :  भारतामध्ये बनावट क्रिप्टोकरन्सी घोटाळा समोर आला आहे. यामध्ये तब्बल 900 जणांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. हा घोटाळा 1200 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. नवीन क्रिप्टोकरन्सीच्या नावावर ही फसवणूक झाल्याचे समोर येते. अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate) कडून बनावट क्रिप्टोकरन्सी घोटाळ्यासंदर्भात खुलासा करण्यात आला आहे. IOC म्हणजेच इनिशियल कॉईन ऑफरिंग याच्या नावाखाली 900 लोकांची 1200 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे . फसवणूक झालेल्या बहुतेक लोकांनी 2020 मध्ये लॉकडाऊनच्या कालावधीत “Morris Coin” हे बनावट कॉईन विकत घेतले होते. इंडियन एक्सप्रेसने ईडीमधील सूत्रांच्या हवाल्याने बनावट क्रिप्टोकरन्सी घोटाळ्याबाबतचं वृत्त दिले आहे. 


बनावट क्रिप्टोकरन्सी घोटाळ्याबाबत ईडीने देशभरात अनेक ठिकाणी छापेमारी केली. केरळमधील एका व्यक्ती या घोटाळ्याचा सूत्रधार आहे, हा व्यक्ती देश सोडून फरार झाल्याचेही समोर आले आहे. या व्यक्तीवर मनी लाँड्रिंगचे खटले सुरू आहेत. ईडीने दाक्षिणात्या अभिनेत्याच्या घरावरही यासंदर्भात छापेमारी केली. या अभिनेत्याने या क्रिप्टोकरन्सी घोटाळ्याशी कोणताही संबध नसल्याचे सांगितले.


कसा झाला घोटाळा? 
2020 मध्ये कोईम्बतूर येथील  क्रिप्टोक्रेन्सी एक्सचेंज Franc Exchange मध्ये  “Morris Coin” लिस्ट करण्यात आले होते. एखाद्या आयपीओप्रमाणे  “Morris Coin” लोकांसमोर सादर करण्यात आले. 10  “Morris Coin” ची किंमत 15 हजार रुपये ठेवण्यात आली होती. यासाठीचा लॉक-इन कालावधी 300 दिवसांचा होता.  “Morris Coin” खरेदी करणाऱ्याला एक ई-वॉलेटही देण्यात आले होते. प्रोमोटरने या क्रिप्टोकरन्सीची किंमत लवकरच वाढेल, असे अमिष गुंतवणूकधारकांना दाखवण्यात आले होते. सुरुवातीला Long Rich Technologies, Long Rich Trading आणि Long Rich Global यासारख्या कंपन्यांनी ऑनलाइन एज्युकेशन अॅप असल्याचे सांगून गुंतवणूकदारांना आकर्षित केले. त्यानंतर “Morris Coin” क्रिप्टोकरन्सी असल्याचा दावा केला, तसेच हे क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजमध्ये लिस्टेड असल्याचेही सांगण्यात आले. तसेच काही दिवसांत पैसे दुप्पट होतील, असेही सांगण्यात आले. प्रमोटरच्या या आमिषाला अनेकजण बळी पडले, अन् बनावट क्रिप्टोकरन्सी खरेदी केली. 


 लोकांचा पैसा रिअल इस्टेटमध्ये - 
ईडीच्या सूत्रांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार, घोटाळेबाजांनी गुंतवणूकदारांकडून घेतलेल्या पैशातून रिअल इस्टेटमध्ये बेकायदेशीरपणे गुंतवणूक केली. सर्वाधिक गुंतवणूक केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांमध्ये झाली.  


ईडीची छापेमारी - 
गेल्या काही दिवसांपासून बनावट क्रिप्टोकरन्सीसंदर्भात ईडीने विविध ठिकाणी छापेमारी केली आहे. केरळ, तामिळनाडू आणि दिल्लीत ईडीने छापेमारी केली आहे. बेंगळुरूस्थित लाँग रिच टेक्नॉलॉजीज आणि मॉरिस ट्रेडिंग सोल्युशन्स, Unni Mukundan Films Pvt. Ltd मध्येही ईडीने छापेमारी केली आहे.  


कोण आहे घोटाळेबाज - 
900 जणांना 1200 कोटी रुपयांची फसवणूक झाली. या बनावट क्रिप्टोकरन्सी घोटाळ्याचा मुख्य सुत्रधार  31 वर्षीय निषाद हा आहे. निषादने बनावट क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून 900 जणांना फसवल्याचे ईडीने सांगितले.