नागपूरः महानगरपालिका दरवर्षी गणेशोत्सवादरम्यान पीओपी मूर्ती विक्रेत्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करते. परंतु काल, सोमवारी गणेशोत्सवाच्या तयारीबाबत झालेल्या महापालिका अधिकाऱ्यांच्या बैठकीत या विषयाला बदल देण्यात आला. एकीकडे सरकारने गणेशोत्सवासाठी निर्बंधही हटवले की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.महानगरपालिकेने अद्याप धोरण स्पष्ट न केल्याने पीओपी मूर्ती विक्रीबाबत संभ्रम वाढला आहे.


पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये यासाठी पर्यावरणपूरक मूर्तीच्या विक्रीवर महापालिका भर देत असते. आयुक्त राधाकृष्णन बी यांनी काल गणेशोत्सवाच्या तयारी, मंडळांना लागणारी परवानगी आदीबाबत बैठक घेतली. या बैठकीतून त्यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे आवाहन केले. परंतु, पर्यावरणाला धोका असलेल्या पीओपी मूर्तीच्या विक्रीचे नियम, मार्गदर्शक तत्वाबाबत शब्दही काढला नाही. गणेशोत्सवासाठी तयारी सुरू असून अनेक मूर्तीकार मूर्ती तयार करीत आहे. त्यामुळे आतापासूनच पीओपी मूर्तींबाबत महापालिकेने भूमिका स्पष्ट करणे गरजेचे आहे. परंतु अजूनही पीओपी मूर्ती विक्रीवर बंदी आहे की नाही, याबाबत काहीही स्पष्ट करण्यात आले नाही. राज्य सरकारने निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यास मुभा दिली आहे. त्यामुळे पीओपी मुर्ती विक्रीवरीलही निर्बंध हटवले तर नाही, याबाबत महापालिकाही संभ्रमात असल्याचे दिसून येत आहे. दरवर्षी महापालिका पीओपी मूर्ती विक्रेत्यांसाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर करते. पीओपी मूर्ती विक्रेत्यांनी दुकानापुढे पीओपी मूर्ती विक्रेत्यांनी दुकानापुढे पीओपी मूर्ती विक्री होत असल्याचे बॅनर लावणे, नागरिकांना पीओपी मूर्तीचे विसर्जन कृत्रिम टँकमध्ये करण्याचे आवाहन करण्याच्या सूचना केल्या जातात. परंतु यंदा काहीही ठरले नाही. पीओपी मूर्ती विक्रेत्यांनी मूर्तीवर लाल रंगाचे चिन्ह करण्याचे आवाहनही महापालिका करीत असते. असे कुठलेच आवाहनही यंदा अद्यापर्यंत करण्यात आले नाही. एवढेच नव्हे महानगरपालिकेने पीओपी मूर्ती विक्रेत्यांसाठी ठरवून दिलेल्या निकषाचे पालन होत आहे की नाही, यावर लक्ष ठेवण्यासाठी एक पथक तयार केले जाते. मात्र, याबाबतही महानगरपालिकेने अद्याप पुढाकार घेतला नसल्याची सूत्रांची माहिती आहे.


परिश्रम जाणार का व्यर्थ?


दरवर्षी शहरात दोन लाखांवर गणेश मूर्तींचे विसर्जन होते. मागील वर्षी कोरोनामुळे गणेशोत्सवात सार्वजनिक व घरगुती गणेश मूर्तीत घट झाली. त्यामुळे केवळ सव्वा लाख मूर्तीचे विसर्जन झाले. यात केवळ पाच ते सहा हजार पीओपी मूर्ती होत्या. महापालिका तसेच पर्यावरणप्रेमी संस्थांमुळे नागरिकांतही जनजागृती झाली. परंतु यंदा पीओपी मूर्तीबाबत कुठलीही जनजागृती, नियम, निकष जाहीर न झाल्याने गेल्या पाच-सहा वर्षातील परिश्रम व्यर्थ जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.