नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे जाहिर करण्यात आलेल्या दहावी परीक्षेच्या निकालात नागपूर महानगरपालिकेच्या शाळेतील प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा मनपा आयुक्त आणि प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आयुक्त सभाकक्षात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी चिन्मय गोतमारे, मनपाचे अतिरिक्त आयुक्त दीपकुमार मीना, राम जोशी आणि शिक्षणाधिकारी प्रीति मिश्रीकोटकर प्रामुख्याने उपस्थित होते. 


यावर्षी मनपाच्या शाळांचा निकाल 99.31 टक्के एवढा लागला आहे. विशेष म्हणजे, नागपूर महानगरपालिकेच्या मराठी माध्यमांच्या शाळांनी शंभर टक्के निकाल नोंदवित मनपा शाळाही मागे नाहीत हे दाखवून दिले आहे. हिंदी माध्यमाचा निकाल 98.45 टक्के, उर्दू माध्यमाचा निकाल 99.77 टक्के आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा निकाल 99.31 टक्के लागला आहे. 


याप्रसंगी विद्यार्थ्यांचा मार्गदर्शन करतांना मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. म्हणाले, मनपाच्या विद्यार्थ्यांनी राज्य परीक्षा महामंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत मोठी भरारी घेतली आहे. शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षक तसेच त्यांच्या पालकांचे त्यांना मार्गदर्शन प्राप्त झाले आहे. विद्यार्थ्यांनी आपण खासगी शाळांतील मुलांपेक्षा कमी आहोत या मानसिकतेपासून दूर राहण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.


मनपाच्या विद्यार्थ्यांनी कठीण परिश्रम आणि केंद्रीत राहून ते कुणापेक्षाही कमी नसल्याचे दाखवून दिले. आपल्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेची तयारी करायला हवे, असेही त्यांनी सांगितले. मनपाचे विद्यार्थी सुद्धा नीट, जेईई, प्रशासकीय परीक्षेची तयारी करण्याच्या मानसिकतेत आहे. त्यांना मनपाच्या शिक्षण विभागातर्फे मदत करण्यात येईल. त्यांनी विद्यार्थ्यांना स्मार्ट हार्डवर्क आणि फोकस राहण्याचे आवाहन केले. 


आपण स्वत: सुद्धा शासकीय शाळेत मातृभाषेतून शिक्षण घेतल्याचे आयुक्तांनी यावेळी सांगितले. त्यांनी मुलांना गणित, विज्ञान आणि इतर विषयाचा अभ्यास करण्याचा सल्ला दिला. आयुक्तांनी मनपा शाळेच्या यशाबद्दल शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर यांचे सुद्धा अभिनंदन केले. मनपा आयुक्त आणि इतर मान्यवरांच्या हस्ते प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा तुळशी रोप व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.


जयताळा मराठी माध्यम शाळेची विद्यार्थिनी प्रगती धुरेंद्र मेश्राम, विवेकानंद नगर माध्यमिक शाळेची विद्यार्थिनी बरखा सुनील साहू, उर्दू माध्यमातून कामगारनगर उर्दू मध्यम शाळेची महेक खान कय्युम खान, इंग्रजी माध्यमातून जी.एम. बनातवाला मनपा इंग्रजी शाळेची विद्यार्थिनी आफरीन सदफ इरशद, दिव्यांग विद्यार्थ्यांमधून जी.एम. बनातवाला मनपा इंग्रजी शाळेची विद्यार्थिनी बुशरा हबीब खान, मराठी माध्यमातून दुर्गनगर माध्यमिक शाळेची सह्याद्री प्रवीण भुसारी, राममनोहर लोहिया शाळेची धनश्री राजेंद्र भांडारकर, हिंदी माध्यमातून विवेकानंद नगर शाळेची साधना राजू वर्मा, ममता पुरुषोत्तम वर्मा, उर्दू माध्यमातून ताजबाग उर्दू माध्यमिक शाळेची नुजहत परवीन मो. अब्दुल जमील आणि गंजीपेठ उर्दू माध्यमिक शाळेची राबिया परवीन अब्दुल कादिर या सर्व विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. इंग्रजी माध्यमातून जी.एम. बनातवाला शाळेची सना परवीन इरशद, बुशरा हबीब खान यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांचे पालक आणि शिक्षक यावेळी उपस्थित होते.


शिक्षणाधिकारी श्रीमती प्रीति मिश्रीकोटकर यांनी मनपा शाळांच्या निकालाबद्दल माहिती देताना सांगितले की, मनपा शाळांचा निकाल 99.31 टक्के लागला आहे. मराठी शाळांचा 100 टक्के, हिंदीच्या 6 शाळांचा 100 टक्के, उर्दूच्या 8 शाळांचा निकाल 100 टक्के आणि इंग्रजी शाळांचा निकाल हा सुद्धा 99 टक्के लागला आहे. मनपाच्या सर्व शाळांमधून 1456 विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी 1446 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये 158 विद्यार्थी प्राविण्यप्राप्त असून 901 विद्यार्थी प्रथम श्रेणी, 365 द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले. 22 शाळांचा निकाल 100 टक्के आला असून 90 टक्क्यांवर 7 शाळांचा निकाल लागला आहे. 


प्रथम येणाऱ्यास 25 हजार अन् सुवर्ण पदक
 
मनपातर्फे प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला 25 हजार रुपये आणि सुवर्ण पदक, द्वितीय येणाऱ्याला 15 हजार रुपये आणि तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्याला 10 हजार रुपये पारितोषित देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन सहा.शिक्षणाधिकारी  सुभाष उपासे यांनी केले तर आभार  गहुकर यांनी मानले. यावेळी मुख्याध्यापक राजेंद्र पुसेकर, नितीन भोळे आणि विनय बगले उपस्थित होते.