शेतकऱ्यांना महाबीजच्या वाढीव दराचा परतावा मिळणार
एबीपी माझा वेब टीम | 19 Jun 2016 03:46 AM (IST)
मुंबईः महाबीजने केलेल्या बियाण्यांच्या दरवाढीचा परतावा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल, असं मुख्यमंत्री कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आलं आहे. शेतकऱ्यांना यासाठी खरेदी केलेल्या बियाण्यांच्या पावत्या आवश्यक असणार आहेत. शेतकऱ्यांनी जवळच्या कृषी सहाय्यकाकडे बिलाची पावती सादर करावयाची आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना वाढीव बिलाचा परतावा मिळणार आहे. सर्व बियाणी जुन्या दरानेच मिळतील असं, सीएमओने सांगितलं आहे. 'माझा'चा पाठपुरावा महाबीजने दरवाढ केल्यानंतर दरवाढीची बातमी सर्वात अगोदर 'एबीपी माझा'च्या वेबसाईटने दिली होती. त्यानंतर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी या बातमीची दखल घेत तत्काळ दरवाढ रोखण्याची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी मागील आठवड्यात झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत दरवाढीला स्थगिती दिली. मात्र या स्थगितीपर्यंत जवळपास 60 ते 70 टक्के बियाण्यांची वाढलेल्या दरानुसार विक्री झाली होती. त्यामुळे 'माझा'ने वाढीव दराचा परतावा मिळणार का, यासाठी देखील सातत्याने पाठपुरावा केला होता.