मुंबई : शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाराष्ट्र विकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर लगेच मुख्यमंत्री ठाकरे यांनी पहिली मंत्रिमंडळ बैठक घेत काही निर्णय देखील घेतले. महाविकास आघाडीच्या माध्यमातून सेनेचे मुख्यमंत्री झाला असला तरी 'ये इश्क नहीं आसाँ, आग का दरिया है और तैर के जाना है', अशी शिवसेनेची स्थिती असणार आहे. कोणकोणत्या आघाड्यांवर शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याला सामना करावा लागेल.
मुख्यमंत्री पद
सत्तेच्या मनोऱ्यातील सर्वोच्च स्थानी आणि सर्वशक्तीशाली असणारं हे पद. बाकी कुणालाही कितीही आणि कोणतीही महत्वाची पदं मिळो....पण, मुख्यमंत्री पदाची ताकद अन्य सर्व खात्यांना व्यापून असते. आणि याच पदावर आता शिवसेनेचा मुख्यमंत्री बसणार हे जवळपास निश्चित आहे. मात्र, मुख्यमंत्रिपदाची ही खुर्ची तशीही काटेरी असतेच, पण ज्या राजकीय परिस्थितीत ही सत्ता, हे पद शिवसेनेला मिळणार आहे, ते पाहता शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याची मोठी शक्ती ही काही महत्वाच्या आव्हांनांनो तोंड देण्यातच खर्ची पडू शकते.
शिवसेनेअंतर्गत सत्ताकेंद्र-रिमोटकंट्रोल
1995 साली जेव्हा युतीची पहिल्यांदा महाराष्ट्रात सत्ता आली, तेव्हा मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले होते. त्यावेळी, सत्तेचा रिमोट कंट्रोल आपल्याकडेच असल्याचा दावा, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी केला होता. सरकारचा कारभार मंत्रालयातून कमी आणि मातोश्रीवरून जास्त होत असल्याच्यी चर्चाही तेव्हा होती. यावेळीही उद्धव ठाकरे वगळता अन्य कुणी शिवसेना नेता मुख्यमंत्री झाल्यास, मातोंश्रीचं वर्चस्व नसेलच असं नाही
दोन्ही काँग्रेसची दोस्तीत कुस्ती
प्रेमळ मिठीत श्वास घुसमटवून टाकायचा, अशा प्रकारचा एक वाकप्रचार आहे. ज्यांच्या साथीमुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री बसणार आहे ते काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सेनेची अशीच अवस्था करू शकतात. काँग्रेसकडील पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात असे नेते तर राष्ट्रवादीमधील अजित पवार, धनंजय मुंडे, जयंत पाटील असे धुरीण! या नेत्यांनी शासन-प्रशासन हाताळलं आहे. काही माजी मुख्यमंत्री राहिले आहेत. प्रशासनातील अधिकारी या मंडळींना मानतात. त्यामुळे शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याला या सहकाऱ्यांना सांभाळता सांभाळता नाकापेक्षा मोती जड होऊ न देण्याची काळजी घ्यावी लागेल.
घास हिरावला गेलेला भाजप
स्वत:चे 105 आणि पाठिंबा मिळालेले 10 बंडखोर अपक्ष आमदार अशाप्रकारे आज भाजपचं आमदारांचं संख्याबळ 115 आहे. मात्र उपयोग शून्य! मी पुन्हा येईन म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना विधीमंडळ नेतेपदी निवड झाल्यावर मुख्यमंत्रिपद फक्त एक पाऊल दूर वाटलं असेल. मात्र, शिवसेनेच्या खेळीनं विरोधी पक्ष कुठाय? म्हणणाऱ्या फडणवीसांना आणि त्यांच्या आमदारांना विरोधी बाकं भरावी लागणार आहेत. असा सत्ता डावलला गेलेला भाजप शिवसेनेला सुखानं संसार करू देईल असं मानणं भाबडेपणाचं ठरेल.
मोदी-शाह इतके शांत कसे?
छोटी राज्यही न सोडणारे, आमदारांची पुरेशी संख्याही नसताना सत्ता खेचून आणणारे भाजपचे अध्यक्ष अमित शाह महाराष्ट्राबाबत इतके गप्प कसे? याचं कोडं राजकीय निरिक्षकांना सुटत नााहीये. जोडीला मधेच शरद पवारांनी मोदींची भेट घेणं वगैरे धक्के आहेतच. केंद्रात आज पूर्ण बहुमतासह भाजपची सत्ता आहे. विविध मार्गांनी केंद्रीय सत्ता राज्यांवर प्रभाव टाकत असते. त्यामुळे शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याला दिल्लीशीही संधान ठेवावं लागणार आहे.
हिंदुत्ववादी आणि पुरोगामी संघटना
महाराष्ट्रात अनेक असे मुद्दे आहेत ज्यावर हिंदुत्ववादी आणि पुरोगामी भिडत असतात. औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करणं, हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर होणारी कारवाई अशा मुद्यांवर हिंदूत्ववादी आक्रमक असतात. तर, अर्बन नक्षलवादाच्या नावाखाली सरसकट टार्गेट केलं जाणं, हिंदुत्ववादी संघटनांना वैचारिक विरोध, दलितव अल्पसंख्याकांवरील हल्ले, शिक्षणाचं भगवेकरण, पर्यावरण आदी मुद्यावर पुरोगामी सघर्ष करतात. महाविकास आघाडीत या दोन्ही बाजंकडील पक्ष असल्यानं शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याची अडचण होणार आहे.
ही आव्हानं पाहता, शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याला मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील कार्यलयात एसी असूनही अनेकदा घाम पुसावा लागेल हे निश्चित.
उद्धव ठाकरेंसमोर असलेल्या पाच मोठ्या संधी कोणत्या?
1. मराठी भाषा आणि मराठी शाळा वाचवण्याची अमूल्य संधी
2. भूमिपुत्रांना रोजगारात 80 टक्के रोजगार देण्याच्या कायद्याची अंमलबजावणी
3. महिलांना मंत्रिमंडळातही मोठं स्थान देऊन समानता दाखवता येईल
4. प्रबोधनकारांनी सर्वसमावेशकतेची शिकवण दिली होती, हिंदुत्वामुळे शिवसेना त्यात फार योगदान देऊ शकत नव्हती ती इमेज बदलणं.
5. महाराष्ट्रातील तरुणांना उद्योगांसाठी उद्युक्त करणं. कारण मुंबईत जवळपास सगळे उद्योग गुजराती, सिंधी लोकांचे आहेत.
उद्धव यांच्या काळात या 5 प्रकल्पांचं काय होणार?
1. आरेचं कारशेड
2. नाणार प्रकल्प
3. बुलेट ट्रेन
4. समृद्धी हायवे
5. मराठवाडा वॉटर ग्रीड
नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांसमोरची पाच आव्हानं, पाच मोठ्या संधी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Nov 2019 11:41 PM (IST)
महाविकास आघाडीच्या माध्यमातून सेनेचे मुख्यमंत्री झाला असला तरी 'ये इश्क नहीं आसाँ, आग का दरिया है और तैर के जाना है', अशी शिवसेनेची स्थिती असणार आहे. कोणकोणत्या आघाड्यांवर शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याला सामना करावा लागेल.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -