नागपूर : मुंबई मंत्रालयात ग्रामीण भागातून अनेक जण येतात. ग्रामीण भागातील नागरिकांना मुंबईला अनावश्यक यावं लागू नये, यासाठी प्रत्येक जिल्ह्यात मुख्यमंत्री कार्यालय सुरू करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत केली. विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना ते बोलत होते. ते म्हणाले की, नागरिकांना कोणतीही मदत, काहीही लागेल तर त्यांना मुंबईऐवजी तिथे ते जाऊ शकतील. सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे, असे ते म्हणाले.


राज्यातील आदिवासी बांधवांसाठी दरवर्षी बजेटमध्ये लोकसंख्येच्या आधारावर तरतूद करू. तो पैसा त्यांच्यासाठीच खर्च करू, असेही ठाकरे म्हणाले. ते पुढे म्हणाले की, राज्यात अनेक ठिकाणी हायवेला जोडणारे रस्ते व्यवस्थित नाहीत, ती दुरावस्था संपूर्ण महाराष्ट्रात आहे. हे सुधारवण्यासाठी चालना देऊ. यासाठी केंद्राकडे विचारू, नाही मिळालं तर दुसरा पर्याय बघू, असेही ते म्हणाले.

ठाकरे म्हणाले की, विदर्भासाठी समृद्धी महामार्ग लवकरात लवकर पूर्ण करत आहोत, या मार्गासाठी सरकार निधी देणार आहे. हा महामार्गाच्या आजूबाजूला कृषी समृद्धी केंद्रे विकसित करण्याचा आमचा विचार आहे. ह्यातून पाच लाख लोकांना रोजगार मिळेल, असेही ठाकरे म्हणाले.

हेही वाचा - शिक्कामोर्तब... आता समृद्धी नव्हे तर 'हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग'

पुढे ते म्हणाले की, सरकारने कोणत्याही सिंचन प्रकल्पाना स्थगिती दिलेली नाही. 323 सिंचन प्रकल्पांचे काम सुरू आहे. जून 2023 पर्यंत हे सर्व प्रकल्प पूर्ण करू. गोसेखुर्द पूर्ण करण्यासाठी जो निधी लागेल तो देऊ, असेही त्यांनी सांगितलं. तसेच लवकरात लवकर पूर्व विदर्भात एक मोठा स्टील प्रकल्प उभा करण्याची घोषणा देखील ठाकरे यांनी केली. तसेच 253 कोटी फक्त यवतमाळ जिल्ह्यासाठी तिथल्या रखडलेल्या प्रकल्पांसाठी देण्याची घोषणा त्यांनी केली. विदर्भातील काम स्थगितीने नाही तर गतीने करू, असेही ते म्हणाले.मी विदर्भाचा नातू आहे. बाळासाहेबांची आई अमरावती मधली. मला विदर्भात आजोळासारखं प्रेम मिळालं. आजोळचे आशीर्वाद माझ्यासाठी असेच कायम ठेवा, असेही ते म्हणाले.

ठाकरे म्हणाले की, जर आमचे पंतप्रधान बाहेरच्या देशांना आर्थिक मदत करतात तर आपल्याच देशातील राज्यांना मदत करू शकत नाही का? त्यांनी मदत नाही केली तर जायचं कुणाकडे? मोदीजी हे भाजपचे नाही ते देशाचे आहेत, असेही ठाकरे म्हणाले.