प्रशासनाकडून विषबाधा प्रकरणाचा शोध घेतला जात आहे. देशी बनावटीचे फवारणी पंप किंवा बॅटरीवर चालणारे स्वयंचलित पंप यांसोबत आता चिनी बनावटीचे फवारणी पंपही सध्या बाजारात उपलब्ध आहेत. या पंपच्या सहाय्याने कमी वेळात जास्त एकराची फवारणी करता येते. त्यामुळे या पंपांना जास्त मागणी आहे.
पेट्रोलवर चालणारा हा चिनी पंप मोठ्या प्रमाणात तुषार फेकतो. या पंपातून निघणारे तुषार हलके राहत असल्याने ते हवेत जास्त काळ राहतात. शेतकऱ्यांनी पुरेशी काळजी घेतलेली नसेल तर यातूनच विषबाधा होते, असा निष्कर्ष समोर आला आहे.
अशीच फवारणी यवतमाळ जिल्ह्यातील राजूरवाडी येथील शेतमजूर नितीन सोयाम यांनी केली. त्यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाल्याने तीन दिवस त्यांचे डोळे उघडलेच नाही. उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डोळे नीट होण्यासाठी पुढचा एक महिना काळजी घ्यावी लागणार आहे. चिनी पंप वापरल्यामुळे असं झाल्याचं सोयाम यांचं म्हणणं आहे.
विषबाधा होण्यामागची कारणं काय?
यवतमाळ जिल्ह्यातील 20 शेतकऱ्यांना कीटकनाशकांच्या फवारणीमुळे विषबाधा होऊन जीव गमवावा लागला. तर साडे पाचशेपेक्षा जास्त शेतकऱ्यांना विषबाधा झाली. अतिविषारी जहाल कीटकनाशकांचा वापर, परवाना नसलेली कीटकनाशकांची कृषी केंद्र चालकांकडून होणारी विक्री, शेतकरी आणि शेतमजूर यांच्याकडून योग्य दक्षता न घेता केली गेलेली फवारणी, कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना कीटकनाशक फवारणीसाठी मार्गदर्शनाचा अभाव ही विषबाधा होण्यामागची प्रमुख कारणं असल्याचं समोर आलं आहे.
चिनी बनावटीचा पंप बाजारात 3 हजार रुपयांपासून 5 हजार रुपयांपर्यंत मिळतो. पेट्रोलवर चालणारा हा पंप आहे. त्यामुळे कमी वेळात जास्त फवारणी होते. त्यामुळे अलीकडच्या काळात या पंपांचा वापर वाढला आहे.
फवारणी करताना काय काळजी घ्याल?
फवारणी करताना तोंडाला कापड लावलं तर श्वास घेता येत नाही. बूट घातले तर वजन घेऊन चालत येत नाही, त्यामुळे अशी काळजी घेतली नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उलटी, मळमळ, चक्कर येणे हा त्रास सुरू होतो.
शेतकरी अनेकदा दिवसभर तापत्या उन्हात काम करतात. कीटकनाशकाचे डब्बे सुरक्षित ठिकाणी जमिनीत टाकून नष्ट करावेत, फवारणी करताना वाऱ्याची दिशा पाहावी, कीटकनाशक जमिनीवर आणि गवतावर सांडू देऊ नये, फवारणी केल्यानंतर हात-पाय स्वच्छ धुवावे, कोट, हातमोजे, टोपी, डोळ्यांसाठी गॉगल या साहित्याचा वापर करावा, फवारणी करताना कीटकनाशकाची मात्रा न घेता नेमून दिलेल्या मापानुसार कीटकनाशक फवारावे, असा सल्ला डॉक्टर देत आहेत..
ही सर्व आकडेवारी सराकरी रुग्णालयांमधील आहे. खाजगी रुग्णालयांमध्येही हजारो शेतकरी उपचार घेत आहेत. त्यामुळे कृषी विभागाने जागरूकता मोहीम राबवण्याची गरज निर्माण झाली आहे.
संबंधित बातम्या :