Chhatrapati Sambhaji Nagar Rain Update : गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या नजरा पावसाकडे (Rain) लागल्या होत्या. तर बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षेत असलेला पाऊस मंगळवारी (27 जून) जिल्हाभरात सर्वदूर पाहायला मिळाला. त्यामुळे आता शेतकऱ्यांचा पेरण्यांचा मार्ग मोकळा झाला. जिल्ह्यातील नऊही तालुक्यात मंगळवारी पावसाने कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.


जिल्ह्यात कुठे-कुठे पाऊस झाला?


गंगापूर : मंगळवारी गंगापूर शहर आणि परिसरात  सकाळपासून अधूनमधून रिमझिम पाऊस पडत होता. मात्र दुपारी चार वाजता तासभर जोरदार पाऊस कोसळला. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. यामुळे लांबलेल्या खरिपाच्या लागवडीला वेग येणार आहे. 


खुलताबाद : तालुक्यात शहर व तालुक्यातील अनेक भागांत सकाळपासून मध्यम स्वरुपात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पेरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मंगळवारी खुलताबाद शहर परिसरात सकाळपासून पावसाची रिपरिप सुरु होती. खुलताबाद, वेरूळ, सुलतानपूर, कानडगाव, देवळाणा, सुलीभंजन, नंद्राबाद, खिर्डी, मावसाळा आदी गावांसह तालुक्यातील इतर भागात पेरणीयोग्य पाऊस झाला आहे. 


गल्लेबोरगाव : बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर गल्लेबोरगाव परिसरात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू झाली आहे. गल्लेबोरगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या होत्या. अशातच मंगळवारी परिसरातील अनेक गावांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. अपेक्षेप्रमाणे जरी पाऊस झाला नसला तरी पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.


कन्नड : शहरात मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास पाऊण तास मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. तालुक्यातील हतनुर, देवगाव आणि चिखलठाण परिसरात सुमारे तासभर मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. या परिसरात सतत तीन दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड सुरु केली आहे. नाचनवेल, चापानेर, वासडी, नाचनवेल, नागद परिसरात हलका पाऊस पडला. या परिसरातील शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.


सिल्लोड : तालुक्यातील सर्व 8 महसूल मंडळात मंगळवारी सकाळपासून हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. तालुक्यातील जवळपास 50 टक्के पेरण्या झाल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची व्यवस्था होती, अशा शेतकऱ्यांनी ठिबकवर कापूस लावला आहे. तर काहींनी कोरड्यातच मका लागवड केली आहे. इतर शेतकरी मोठ्या पावसाची वाट पाहत आहेत. मंगळवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरु होती या पावसामळे पहिल्या टप्प्यात पेरणी केलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे.


बिडकीन : पैठण तालुक्यातील बिडकीन आणि परिसरात मंगळवारी जोरदार पावसाने हजेरी लावली. या वर्षीचा हा पहिलाच पाऊस असल्याने बळीराजा सुखावला आहे. मंगळवारी दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान चितेगाव, बिडकीन, म्हारोळा, निलजगाव, पैठणखेडा, बोकूड जळगाव, पांगरा, बाभुळगाव आदी भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली. परिसरात यंदा खरीप हंगामात कपाशी आणि तूर पिकांची मोठ्या प्रमाणावर पेरणी होणार आहे.


वैजापूर : लांबणीवर पडलेल्या पावसाने अखेर मंगळवारी दुपारी वैजापूर शहरासह तालुक्यात सर्वदूर हजेरी लावली. त्यामुळे पहिल्या टप्प्यात पेरणी केलेल्या खरीप हंगामातील अंकुरलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे. वैजापूर शहर आणि परिसरात दुपारी अडीच वाजेच्या सुमारास हलक्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली. त्यानंतर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पाऊस झाला. पूर्व भागातील गारज, झोलेगाव, जरुळ, खंडाळा, चिकटगाव, शिऊर परिसरात पाऊस झाला. याशिवाय महालगाव, वाघला, चिंचडगाव, कनकसागज या गावांसह गंगथडी भागातील बहुतांश गावात पाऊस पडल्याचे वृत्त आहे. 


फुलंब्री : तालुक्यात मंगळवारी सकाळपासून पावसाला सुरुवात झाली. दिवसभर पावसाची तालुक्यातील विविध भागांत रिपरिप सुरु होती. सोमवार सायंकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. मंगळवारी सकाळपासून पावसाला सुरुवात झाली. मध्यम स्वरुपाचा पाऊस तालुक्यातील विविध गावांमध्ये झाला. पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरण्यांची लगबग सुरु केली आहे. काही शेतकऱ्यांनी मंगळवारपासूनच कपाशी लागवड सुरु केली आहे.


पैठण : तालुक्यात मंगळवारी दुपारनंतर सर्वदूर पावसाने हजेरी लावल्याने बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान गेल्या तीन दिवसांत झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा वाढला आहे. मंगळवारी दुपारनंतर पाचोड, बालानगर, चितेगाव, बिडकीन, पिंपळवाडी, दावरवाडी, आपेगाव, रांजणगाव खुरी, दावरवाडी, नांदर, विहामांडवा आडूळ आदीसह पैठण शहरात पावसाने हजेरी लावली. 


बाबरा : फुलंब्री तालुक्यातील बाबरा परिसरात सोमवार व मंगळवारी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी बरसल्या. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्यांना सुरुवात केली आहे. गेल्या काही गेल्या पंधरा दिवसांपासून शेतकरी पावसाकडे नजरा लावून होते. त्यामुळे मंगळवारी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.


सोयगाव : दरम्यान सोयगाव तालुक्यात देखील पावसाने मंगळवारी हजेरी लावली. ज्यात सोयगाव शहर आणि परिसरात 15 मिनिटे हजेरी लावली. मृगाच्या पहिल्याच दिवशी वरुणराजा रिमझिम बरसला. मंगळवारी झालेल्या पावसामुळे उगवून आलेल्या 4 हजार 822 हेक्टरवरील कपाशीला दिलासा मिळाला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Maharashtra Rain : राज्यात काही भागात जोरदार पाऊस, कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट, तर मुंबईसह ठाण्याला यलो अलर्ट