Chhatrapati Sambhaji Nagar : आज सकाळपासूनच शहरात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह शेकडो वाहतूक पोलिस रस्त्यावर उतरले. एकीकडे रिमझिम पाऊस सुरु होता तर दुसरीकडे पोलिसांकडून कारवाईचा धडाका सुरु होता. त्यामुळे अनेक ठिकाणी वादाचे प्रसंग घडले. गेल्या काही दिवसांत शहरात वाहतूक व्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. मुख्य रस्ते असो की अंतर्गत रस्ते, जूने शहर असो की नवे सर्वच ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी होत असते. सध्या शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे सकाळी शाळा भरण्याच्या वेळी आणि सुटण्याच्या वेळी सर्वच मुख्य रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होते. विशेष म्हणजे राँग साईडने जाणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने यामुळे देखील वाहतूक कोंडी होते. त्यामुळे शहरातील वेगेवेगळ्या भागात आज सकाळपासूनच पोलिसांनी कारवाई सुरु केली. ज्यात दिवसभरात वन-वे आणि नो एन्ट्रीमध्ये वाहने घालून नियम तोडणाऱ्या एकूण 304 लोकांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांना 2 लाख 61 हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. 


मंगळवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास वाहतूक शाखेचे सहाय्यक आयुक्त संपत शिंदे यांच्यासह अनेक अधिकारी रस्त्यावर उतरले. जालना रोडवरील सिडको चौक, सेव्हन हिल, मोंढा नाका क्रांतीचौक यासह जळगाव रोड आदी ठिकाणी कारवाई सुरू केली. औरंगपुरा शाळा कॉलेज परिसर, बसस्थानक, टीव्ही सेंटर आदी भागात एकाच वेळी पोलिसांनी कारवाई सुरू केली. ट्रिपल सीट, राँग साईडने जाणारी वाहने, विना नंबर, लायसन्स नसलेल्या वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली. सिट बेल्ट न बांधलेले कारचालक तसेच वाहनावर नंबर व्यवस्थित नसेल तर दंड आकारण्यात आला. जालना रोडवर हायकोर्टासमोर अनेक दुचाकी चालकांवर राँग साईड जात असल्याने कारवाई करण्यात आली. मोंढा नाका, आकाशवाणी परिसरातही अनेक राँग साईड वाहनधारकांना दंड ठोठावण्यात आला.


वाहनधारकांत जनजागृती नाही.


लेफ्ट टर्न बाबत अजूनही वाहनधारकांत जनजागृती नाही. त्यामुळे अनेक वाहनधारक दंड कशाचा असा सवाल पोलिसांना करत होते. तर ट्रिपल सीट जाणाऱ्या तरूणांनीही पोलिसांसोबत हुज्जत घातली. अनेकांनी नेतेमंडळीला फोन लावला, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. पोलिसांच्या या कारवाईने वाहनधारकांत मात्र एकच खळबळ उडाली होती. तर पोलिसांना पाहून अनेकांनी वाहनाचा यूटर्न घेऊन पळ काढण्यात धन्यता मानली.


पोलीस आयुक्त म्हणाले शिस्त पाळा... 


शहरात वाहनधारकांनी शिस्तीचे पालन केले तर वाहतूक कोंडीसारखा प्रश्न निर्माण होणार नाही. लेफ्ट टर्न वर वाहनधारक थांबून असतात, परिणामी कोंडी होते. राँग साईडने जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अशा वेळी कठोर भूमिका घ्यावीच लागते. नियम पाळले गेले तर दंड करण्याची वेळच येणार नाही. दंडाऐवजी एखादा चांगला पर्याय सुचवला तर त्यावर नक्की विचार केला जाऊ शकतो. शासनाला देखील नाइलाजास्तव दंड घ्यावा लागत आहे, असे पोलीस आयुक्त मनोज लोहिया म्हटले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला गालबोट; सामूहिकरित्या पदवी वाटप केल्याने विद्यार्थी आक्रमक