छत्रपती संभाजीनगर : विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार (Vijay Wadettiwar) यांनी ओबीसी (OBC) बनावट प्रमाणपत्राचे केलेले आरोप खोटे असुन असे कोणतेही प्रमाणपत्र माझ्याकडे नसल्याचे स्पष्टीकरण विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी दिले आहे. वड्डेटीवार यांनी माध्यमांना माहिती दिली असेल तर त्याचे पुरावे सर्वांसमोर सादर करावे, असे आवाहन दानवे यांनी केले आहे. तर, दानवेंकडे ओबीसीचं बोगस प्रमाणपत्र (OBC bogus certificate) असल्याचा आरोप वड्डेटीवार यांनी केला आहे.
विजय वडेट्टीवार यांनी व्यक्तिशः माझ्यावर केलेले आरोप पूर्णतः खोटे असून त्यांच्याकडे अशी काही माहिती असेल तर त्यांनी याचे पुरावे सादर करुन सत्य माहिती सर्वांसमोर सादर करावी. जेणेकरून वास्तव परिस्थिती समोर येईल.तसेच विरोधी पक्षनेते यांनी सत्य माहिती घेऊन असे आरोप करावे असा सल्ला सुद्धा त्यांनी यावेळी दानवे यांनी दिला.
मराठवाड्यात पैसे देऊन मिळतात ओबीसी प्रमाणपत्र : वड्डेटीवार
मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. अशातच मराठा समाजाला सरसकट ओबीसी आरक्षण देऊन नयेत अशी मागणी ओबीसी नेत्यांकडून केली जात आहे. एकीकडे आरक्षणाचा मुद्दा तापला असतानाच विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी अंबादास दानवे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. पैसे देऊन मराठवाड्यात ओबीसी प्रमाणपत्र बनवून दिले जात आहे. तसेच, अंबादास दानवे यांनी देखील असेच प्रमाणपत्र घेतल्याचा दावा वड्डेटीवार यांनी केला आहे. त्यांच्या याच आरोपांना दानवे यांनी उत्तर दिले आहे.
आतापर्यंत कोणत्याही आरक्षित जागेचा लाभ घेतला नाही...
वड्डेटीवार यांच्या आरोपाला उत्तर देतांना दानवे म्हणाले की, शिवसेनेचा एक कार्यकर्ता म्हणून मला अभिमान आहे. शिवसैनिक म्हणूनच मी राज्यभर फिरतो. मी कोणत्याही जातीचा नेता नसून आतापर्यंत कसल्याही आरक्षित जागेचा मी लाभ घेतलेला नाही. नगरसेवक ते विरोधी पक्षनेते पदापर्यंत पोहोचलो तरीही खुल्या गटातून मी निवडून आलेलो आहे, असे दानवे म्हणाले. तसेच, मराठा समाजाला आरक्षण देताना इतर समाजाचे नुकसान होईल असा निर्णय शासनाने घेऊ नये, यामुळे मराठा समाजासह इतर समाजाचे सुद्धा नुकसान होऊ शकते. मराठवाड्यातील शेतकरी समाजाचा उल्लेख अजूनही कुणबट म्हणून केला जातो, मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी हा पुरावा फायदेशीर ठरू शकतो,अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
इतर महत्वाच्या बातम्या:
Maratha Reservation: एकीकडे ओबीसी अन् दुसरीकडे मराठा समाज; निवडणुकींच्या तोंडावर सरकारची कोंडी?