Vanrakshak Bharti Paper Hi-Tech Copy: औरंगाबादमध्ये (Aurangabad) वनरक्षक भरती परीक्षेत (Vanrakshak Bharti Exam) हायटेक कॉपीचे तीन प्रकार समोर आले आहेत. सुराणानगर आणि चिकलठाणा एमआयडीसी आणि वाळूज येथील परीक्षा केंद्रावर तीन परीक्षार्थींना ब्ल्यू टूथ, मोबाईल, मख्खी हेडफोन, मास्टर कार्ड रिडरसहीत ताब्यात घेतले. या प्रकरणी 2 ऑगस्टला जिन्सी आणि एमआयडीसी सिडको ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. 3 ऑगस्टला सातारा ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. परीक्षा केंद्रातील बाथरुममध्ये आधीपासूनच त्यांच्यासाठी हायटेक कॉपीचे साहित्य ठेवलेले होते, असे समोर आले. सचिन अंबादास राठोड, नितीन संजय बहुरे (19, रा. बेंबळ्याची वाडी, घोडेगाव, जि. औरंगाबाद) आणि सतीश मदनसिंग जारवाल (28, रा. टाकळेवाडी, ता. गंगापूर, औरंगाबाद) अशी परीक्षार्थींची नावे आहेत. बहुरेला मदत करणारा करण चतरसिंग गुसिंगे याचाही आरोपींमध्ये समावेश आहे.
वनपरीक्षेत्र अधिकारी विशाल कवडे यांनी जिन्सी ठाण्यात फिर्याद दिली असून, ते सुराणानगर येथील केंद्रावर परीक्षा निरीक्षक होते. 2 ऑगस्टला सकाळी साडेसहा वाजेपासून सव्वाआठ वाजेपर्यंत उमेदवारांना तपासणी करून त्यांनी आत सोडले. त्यानंतर परीक्षा सुरु झाली. दरम्यान 8.50 वाजता निरीक्षणासाठी एका हॉलमध्ये गेले. तेथे उमेदवार नितीन संजय बहुरे याच्याजवळ गेल्यावर तो कच्चे काम करताना दिसला. काही वेळाने ते पुन्हा त्याच्याजवळ गेले असता तो पुन्हा कच्चे काम करताना आढळला. संशय बळावल्यामुळे पर्यवेक्षक विश्वजित बुळे यांना झडती घेण्यास सांगितले असता नितीन बहुरेकडे मोबाइल, मास्टर कार्ड रिडर, मख्खी हेडफोन आदी साहित्य मिळून आले.
तर त्याला त्याचा साथीदार करण चरतसिंग गुसिंगे (रा. पिवळवाडी, जि. छत्रपती संभाजीनगर) यानेच बाथरुममधील हे साहित्य काहीही करून घेऊन जा, असे बजावले होते, अशी कबुली त्याने दिली. बहुरेला अटक केली असून अधिक तपास सहायक निरीक्षक अनिल मगरे करीत आहेत.
दुसरी घटना...
वन परीक्षेत्र अधिकारी राहुल मराठे यांनी एमआयडीसी सिडको ठाण्यात फिर्याद दिली. ते आयऑन डिजीटल झोन परीक्षा केंद्र, एमआयडीसी चिकलठाणा येथे परीक्षा निरीक्षक होते. सचिन अंबादास राठोड हा तेथे परीक्षा देत असताना सकाळी 10 वाजता तो लघुशंकेला जाऊन आला. त्यानंतर महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानामार्फत त्याचे फ्रिस्कींग केले असता त्याच्याकडे वायर्ड हेडफोन आढळले. त्यानंतर त्याला होमगार्ड मार्फत पोलिस ठाण्यात पाठविले. त्याच्यावर मराठे यांनी गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक अर्जुन राऊत करीत आहेत.
तिसरी घटना...
दुसऱ्या घटनेत सतीश मनसिंग जारवाल हा परीक्षार्थी वाळूज येथील बजाज ऑटो लि. जवळील एक्सलन्स कम्प्युटर सेंटरवर परीक्षेसाठी गेला. हॉलमध्ये जाण्यापूर्वी त्याची तपासणी करताना त्याच्याकडे हॉलतिकिट, मायक्रो हेडफोन, इलेक्ट्रिक ब्लू टूथ, त्यात सीमकार्ड मिळून आले. त्याच्याविरुद्ध सहायक वन संरक्षक आशा एकनाथ चव्हाण यांनी सातारा ठाण्यात फिर्याद दिली, अशी माहिती पोलिस निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी दिली.
इतर महत्वाच्या बातम्या: