Teachers Exam : शिक्षणाचा दर्जा ढासळत असल्याचा आरोप होत असताना मराठवाड्याचे तत्कालीन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर (Sunil Kendrekar) यांनी काही दिवसांपूर्वी वेगवेगळ्या विषयांवर सर्वेक्षण करत शिक्षकांची (Teachers) परीक्षा (Exam) घेण्याचा निर्णय घेतला होता. ज्यात प्रशासनाकडून मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात शिक्षकांची परीक्षा घेण्याबाबत ठरले होते. तर या परीक्षेची तारीख ठरल्यानुसार आज आणि उद्या शिक्षकांची परीक्षा होत आहे. मात्र, या परीक्षेला औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील शिक्षकांनी पूर्णपणे पाठ फिरवली आहे. कारण अवघ्या 1 टक्क्यापेक्षा कमी शिक्षक या परीक्षेसाठी उपस्थित असल्याचे पाहायला मिळत आहे. अशीच काही परिस्थिती मराठवाड्यातील इतर जिल्ह्यात सुद्धा पाहायला मिळत आहे. 


मराठवाड्यात आज विभागीय आयुक्त कार्यालयाकडून गुरुजींची परीक्षा घेण्यात येत आहे. जिल्हा परिषद शाळेतील गुरुजींचा शिक्षणाचा आणि शिकवण्याचा स्तर वाढवा म्हणून या परीक्षेचा आयोजन करण्यात आले आहे. मात्र या परीक्षेला औरंगाबादच्या गुरुजींनी पाठ फिरवली आहे. अवघा एक टक्क्यापेक्षा सुद्धा कमी शिक्षक या परीक्षेला उपस्थित आहेत. औरंगाबाद शहर आणि ग्रामीण मिळून 8 हजारांवर शिक्षक आहेत. मात्र त्यापैकी अवघे 977 शिक्षक परीक्षेला हजर असल्याचे चित्र आहे. 


शिक्षक संघटनांचा आधीपासूनच परीक्षेला विरोध


विभागीय आयुक्त कार्यालयाकडून मराठवाड्यातील जिल्हा परिषद शिक्षकांसाठी या परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं. निवृत्त झालेले विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या संकल्पनेतून या परीक्षेचे आयोजन केले आहे. शिक्षकांचा शिकवण्याचा स्तर वाढावा या दृष्टीने परीक्षेचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, या परीक्षेला अनेक शिक्षक संघटनांचा पहिल्यापासूनच विरोध होता. विशेष म्हणजे मराठवाड्यात 23 हजार शिक्षकांनी ही परीक्षा द्यायची तयारी दर्शवल्याचा विभागीय आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आलं होतं. मात्र, प्रत्यक्षात परीक्षा केंद्रावर मोजकेच शिक्षक दिसून येत असल्याने, नेमकी किती शिक्षकांनी परीक्षा दिली हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 


अशी होणार परीक्षा...



  • 30 जुलै रोजी सकाळी 10 ते 11 या वेळेत भौतिकशास्त्र, 11.30 ते 12.30 या वेळेत रसायनशास्त्र, 1 ते 2 या वेळेत जीवशास्त्र या विषयांचे पेपर आहेत.

  • 31 जुलै रोजी सकाळी 10 ते 11 या वेळेत गणित, 11.30 ते 12.30 या वेळेत इंग्रजी 1 ते 2 या वेळेत इतिहास व भूगोल (एकत्रित) विषयांची परीक्षा होणार आहे.

  • चुकीच्या प्रत्येक उत्तरासाठी 0.25 गुण वजा करण्यात येणार आहेत.


संबंधित बातम्या: 


काय सांगता! आता शिक्षकांचीच परीक्षा होणार, शिक्षणाचा दर्जा ढासळल्यानं विभागीय आयुक्तांचा निर्णय


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI