छत्रपती संभाजीनगर : मागील काही दिवसांपासून युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्याकडून सतत सरकारवर टीका करण्यात येत आहे. दरम्यान याच टीकेला आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्याकडून उत्तर देण्यात आले आहे. "मागील आठ दिवसांपासून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे काही लोकं बेजबाबदारपणाने बोलतायत. संजय राऊत (Sanjay Raut) ठीक होते, मात्र आता आदित्यला देखील संजय राऊत चावला की काय?" असे म्हणत शिरसाट यांनी खोचक टीका केली आहे.
यावेळी बोलतांना संजय शिरसाट म्हणाले की, “मिलिटरी आणली तरीही आमचा मेळावा शिवाजी पार्कवरचं होणार आहे. संजय राऊत जे काही बोलतायत ते बेसलेस बोलताय. अर्ज दोघांनीही केला असून, ज्याला परवानगी मिळेल तो मेळावा घेईल. सिल्वर ओकच्या दावणीला बांधलेले काय मेळावा घेणार.आमच्या मेळाव्यातील गर्दी पाहून त्यांची दुकान बंद होईल, म्हणूनचं ते बोलत असल्याचे शिरसाट म्हणाले.
पुढे बोलतांना शिरसाट म्हणाले की, "आदित्य ठाकरे वाघ नखांवर प्रश्न उपस्थित करताय, यातून महाराजांच्या बाबतीत त्यांचे विचार दिसतायत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा उल्लेख बालबुद्धी म्हणून केला आहे. तर. मी बाळासाहेबांचा वंशज आहे, बाळ नावाचा मला अभिमान असल्याचे म्हणत आहे. पण बाळासाहेबांचा एक जरी अंश तुमच्यात असता, तरी तुम्ही राज्याला दिशा दिली असती. माझ्यामुळे दौरा रद्द झाला असे म्हणणारे आदित्य सध्या भ्रमात जगत आहेत, असेही शिरसाट म्हणाले.
दोन पोलीस गेले तर संजय राऊत पळून जातील...
शिवसेनामप्रमुखांचा वारसा आम्ही चालवतोय म्हणून आम्हाला शिवाजी पार्कवर मेळावा घ्यायचा आहे. त्यांचे विचार आम्ही पुढं नेणार आहोत. पण, तुम्ही शिवसेना प्रमुखांचे नाव घेण्याच्या लायकीचे आहेत का? असा प्रश्न आहे. तुम्ही हिंदुत्व शिकवू नका. संजय राऊत यांना सैनिक कशाला हवी 2 पोलीस गेले तरी संजय राऊत पळून जाईल, असे शिरसाट म्हणाले.
प्रकाश आंबेडकर आमच्याकडे आल्यास त्यांचे स्वागत...
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावे असे त्यांच्या लोकांना वाटत असेल तर त्यांना शुभेच्छा आहे. पण, आमदार निवडून आले तरच मुख्यमंत्री होता येत अशी पद्धत आहे. तर, देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे म्हणणाऱ्या नितेश राणे यांच्यावर देखील शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येक पक्ष आपली भूमिका मांडत असतो. त्यांना अपेक्षा आहे, त्यात काही गैर नाही, असे शिरसाट म्हणाले. तसेच प्रकाश आंबेडकरांचे काँग्रेस, राष्ट्रवादीला वावडे आहे. त्यामुळे उद्धव यांनी कितीही आदळआपट केली तरी उपयोग नाही. प्रकाश आंबेडकर अमच्याकडे आलेत तर आम्ही त्यांचं स्वागतच करू, असेही शिरसाट म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या:
थोरले पवार म्हणाले, जनता 'त्यांना' धडा शिकवेल; आता मानसपुत्र वळसे पाटील म्हणतात...