छत्रपती संभाजीनगर : समोर खड्डा आल्याने अचानक ब्रेक दाबल्याने मागून आलेली दुचाकी आयशरला धडकली आणि या अपघातात (Accident) एका दोन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मालेगाव येथून खुलताबाद उरुसासाठी दोन वर्षीय चिमुकल्यासह दुचाकीवर निघालेल्या दाम्पत्यांच्या दुचाकीचा शिऊर बंगला- नांदगाव मार्गावरील शिंदीनाला फाट्यावर अपघात झाला. ज्यात चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला असून, आई-वडील गंभीर जखमी झाले आहेत. आज (1 ऑक्टोबर) दुपारच्या सुमारास हा अपघात झाला आहे. जिहान सलमान शाह (वय 2 वर्षे) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या बालकाचे नाव आहे. तर, सना सलमान शाह (वय 22 वर्षे) व सलमान निजाम शाह (सर्व मूळचे बनशेंद्रा, हल्ली मुकाम मालेगाव) असे जखमींचे नावं आहेत.
अधिक माहितीनुसार, शाह कुटुंब मालेगावहुन खुलताबाद येथे आपल्या दुचाकीवरून (क्रमांक MH 15 HZ 8684) उरुसाला निघाले होते. दरम्यान, साडेचार वाजण्याच्या सुमारास ते शिंदीनाला फाटा येथील धनेश्वर वस्तीजवळ आले. याचवेळी त्यांच्यापुढे चालणाऱ्या आयशर ट्रकने रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यामुळे अचानक ब्रेक दाबला. त्यामुळे सलमान शाह यांची दुचाकी आयशरला जाऊन धडकली. यात पुढे बसलेल्या दोन वर्षीय जिहानच्या डोक्याला जबर मार लागल्याने तो जागीच ठार झाला. तर, सना शाह या दुचाकीवरून खाली पडल्याने त्यांच्याही डोक्याला गंभीर मार लागला. तसेच या अपघातात सलमान शाह हे देखील जखमी झाले.
नागरिकांनी मदतीसाठी घेतली धाव
या अपघातानंतर आयशर चालक ट्रकसह फरार झाला. दरम्यान, धनेश्वर वस्तीवरील दीपक धनेश्वर, विनोद धनेश्वर, सतीश धनेश्वर आणि स्थानिक नागरिकांनी माहिती मिळताच अपघातास्थळी धाव घेत शिऊर पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर, 108 रुग्णवाहीकेला कळवण्यात आले. परंतु, ती वेळेवर न आल्याने खासगी रिक्षाच्या मदतीने अपघातग्रस्तांना शिऊर बंगला येथील खाजगी दवाखान्यात हलवण्यात आले. तसेच, तेथून तातडीची मदत म्हणून शिऊर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या 102 रुग्णवाहिकेतुन देवगाव रंगारी येथे 108 रुग्णवाहिकेपर्यंत अपघातग्रस्तांना नेण्यात आले. त्यानंतर पुढे 108 ने घाटी रुग्णालयात जखमींना हलविण्यात आले.
अवजड वाहनांमुळे रस्त्यावर खड्डे
चाळीसगाव मार्गावरील अवजड वाहने न्यायालयाच्या आदेशामुळे शिऊर बंगलामार्गे वळवण्यात आली आहे. वाहतूक वाढल्याने नवीन मार्गाची चाळणी झाली आहे. वेळोवेळी वाहतूक कोंडी देखील होत आहे. तसेच, अवजड वाहनांमुळे रस्त्यावर खड्डे देखील झाले आहेत. वाढत्या खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहेत. तर, यावर तोडगा काढण्याची मागणी देवगाव रंगारी, गारज, शिऊर बंगला, लोणी खुर्द गावातील नागरिक करत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या: