Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका थांबायचं नाव घेत नाही, शुक्रवारी देखील आणखी एक भीषण अपघात घडला, महामार्गावर उभ्या असलेल्या एका ट्रकवर भरधाव वेगाने येणारी स्विफ्ट डिझायर गाडी आदळली. या भीषण अपघातात कारमधील दोघांचा मृत्यू तर, अन्य दोन गंभीर जखमी असल्याची घटना घडली, ही घटना समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगर जवळ घडली.
रासप पक्षाच्या पदाधिकारीसह एकाचा मृत्यू, दोन गंभीर जखमी
या भीषण अपघातात राष्ट्रीय समाज पक्षाचे विदर्भ उपाध्यक्ष तसेच भंडारा जिल्हाध्यक्ष स्वरूप रामटेके (35) यांच्यासह संदीप साखरवाडे (40) यांचा मृत्यू झाला. तर, रितेश भानादकर (24) आणि आशिष सरवदे (37) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने भंडारा येथील हे पदाधिकारी मुंबईला रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांना भेटण्याकरिता गेले होते. तिथून परतत असताना हा भीषण अपघात घडला.
समृद्धी महामार्गावरील अपघाताचे सत्र सुरूच!
समृद्धी महामार्गावरील एकामागोमाग एक अपघातांचे सत्र पाहता हा महामार्ग प्रवाशांसाठी काळ ठरत असल्याचं समोर येतंय. सातत्याने होणाऱ्या भीषण अपघातांच्या घटनांनी आतापर्यंत अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. काही दिवसांपूर्वी देखील याच महामार्गावर पहाटे झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला होता. चालकाला झोप लागल्याने बाजूच्या कंटेनरला धडक लागल्याने हा अपघात झाला होता. या घटनेला 48 तास पूर्ण होत नाही तर पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात घडला होता. पुण्यावरून अमरावतीकडे जाणाऱ्या एका कारने चालत्या कंटेनरला दिलेल्या जोरदार धडकेत एक जण जागीच ठार झाला. तर एक गंभीर जखमी झाला होता. ही घटना वाशिमच्या मालेगाव-वनोजा दरम्यान लोकेशन चॅनल क्रमांक 234 कॉरिडॉर येथे घडली होती. समृद्धी महामार्गावरील अपघाताची मालिका काही थांबत नसून महामार्ग सुरू झाल्यापसून अनेक छोटे मोठे अपघात झाले आहेत. अपघातांच्या मालिकेनंतर समृद्धीवर प्रवास करायचा की नाही? असा प्रश्न आता पडत आहे.
आतापर्यंत 368 जणांनी आपला जीव गमावला
या महामार्गावर जवळपास एक हजाराच्यावर अपघात घडले आहेत. तर यामधील गंभीर अपघातामध्ये आतापर्यंत 368 जणांनी आपला जीव गमावला आहे. चालकला झोप येणे किंवा डुलकी लागणे यामुळे 183 अपघात, तर टायर फुटल्यामुळे 51 अपघात घडल्याचं सांगण्यात येत आहे. तांत्रिक कारणांमुळे या महामार्गावर आतापर्यंत 200 अपघात झालेअसून त्यामध्ये जवळपास 41 जणांचा बळी गेला आहे. महाराष्ट्राचं भूषण म्हणवलं जाणाऱ्या या महामार्गावरील अपघाताचं प्रमाण बघता आता तरी सरकारने जागे होणे आवश्यक आहे.
हेही वाचा>>>